Border-Gavaskar Trophy 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (Border Gavaskar Trophy) सुरु झाली आहे. या मालिकेची पहिली कसोटी नागपुरात (Nagpur) खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी BCCI ने टीम इंडियाची (Team India) घोषणा देखील केली आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jaspreet Bumrah) पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड झाली नव्हती, मात्र आता तो संपूर्ण मालिकेतूनच बाहेर पडला आहे. बऱ्याच दिवसांपासून मैदानाबाहेर असलेला बुमराह या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी तरी पूर्णपणे फिट असेल अशी अपेक्षा होती, मात्र आता तो संपूर्ण कसोटी मालिकेला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता


भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI) या वर्षाच्या शेवटी होणारा एकदिवसीय विश्वचषकावर अधिक लक्ष केंद्रीत करुन बुमराहला पुन्हा मैदानात उतरवण्याची घाई करत नाही. दुसरीकडे, या कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजांवर अधिक खेळ अवलंबून असल्यामुळे, बुमराहची उणीव संघाला जाणवणार नाही असंही म्हटलं जात आहे. ज्यामुळे त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी अधिक वेळ दिला जात आहे. सप्टेंबर 2022 पासून जसप्रीत बुमराह बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये त्याच्या फिटनेसवर सतत काम करत आहे. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर, संघाला 17 मार्चपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे, ज्यासाठी बुमराह त्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. पण नेमकं तो खेळेल की नाही हे संघ जाहीर झाल्यावरच कळेल.


दुखापतीमुळे बुमराह विश्वचषकालाही मुकला


मागील वर्षभर बुमराह दुखापतीमुळे तसंच विश्रांती घेण्यासाठी संघात आत-बाहेर असल्याचं दिसून येत होतं, पण आता गेले काही महिने तो अजिबातच संघात नसल्याचं दिसून येत आहे. 2022 मध्ये आशिया कपपूर्वी बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला होता. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांआधी तो दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. ज्यानंतर तो संपूर्ण टी20 विश्वचषकाला देखील मुकला. आता श्रीलंका, न्यूझीलंड दौऱ्यांतही खेळू शकला नाही. आताही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी सामन्यात तो संघात नसून एकदिवसीय सामन्यांत खेळेल का हे पाहावं लागेल.  


हे देखील वाचा-