Rohit Sharma in IND vs AUS : भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नागपूर कसोटीत दमदार शतक झळकावलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात असून ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांवर सर्वबाद झाल्यावर भारत फलंदाजी करत आहे. दरम्यान एकीकडे भारताचे बहुतेक फलंदाज फेल होत असताना कॅप्टन रोहित शर्माने शतक ठोकत संघाचा डाव सावरला आहे.


रोहित शर्माच्या नावावर खास विक्रमाची नोंद


विशेष म्हणजे रोहितने शतक झळकावताच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (ODI, Test आणि T20) शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये केवळ चार खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. रोहितपूर्वी बाबर आझम, दिलशान आणि फाफ डू प्लेसिस यांनी हा पराक्रम केला आहे. दरम्यान रोहितने शतक झळकावताच मैदानात उपस्थित सर्वांनीच त्याचं टाळ्या वाजवून कौतुक केलं.






तर सामन्यात सर्वात आधी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली. ज्यानंतर या नागपूर कसोटीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी ऑस्ट्रेलियन संघ 177 धावांवर ऑलआऊट झाला. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ सध्या फलंदाजी करत आहे. भारतासाठी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (10 फेब्रुवारी) रोहितनं दमदार असं शतक झळकावलं. बातमी लिहिपर्यंत त्याने 197 चेंडूंचा सामना करत 115 धावा केल्या होत्या. रोहितच्या या खेळीत 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहितच्या शतकानंतर संपूर्ण ड्रेसिंग रूमने उभं राहून टाळ्या वाजवल्या. दरम्यान रोहितसोबत सध्या जाडेजा फलंदाजी करत असून दोघांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली आहे.


याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पहिल्या डावाचा विचार करता रवींद्र जाडेजाने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजने बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी सर्वात कमाल गोलंदाजी करणाऱ्या जाडेजाने 5 विकेट्स घेतल्या.


 


हे देखील वाचा-