IPL RCB: भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) माजी खेळाडू पार्थिव पटेल याने प्रसिद्ध आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) बद्दल धक्कादायक माहिती उघड केली आहे. आरसीबीच्या संघात फक्त स्टार खेळाडूंनाच मान मिळतो, इतर खेळाडूंकडे विशेष लक्ष दिले जात नाही. याच गोष्टींमुळे संघाने आतापर्यंत आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही, असं पार्थिव पटेलने म्हटलं आहे.
सायरस सेज पॉडकास्टवर बोलताना पार्थिव म्हणाला की, जेव्हा तो आरसीबी संघाचा भाग होता, तेव्हा तिथे संघ म्हणून संस्कृती नव्हती. या सर्व गोष्टींमुळे संघ आजपर्यंत ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. मी संघात होतो तेव्हा विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल देखील होते. आरसीबीने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही. मात्र, असे असूनही संघाचा चाहता वर्ग मोठा आहे. संघ दरवर्षी ट्रॉफी जिंकेल अशी चाहत्यांची अपेक्षा असते.
2024 च्या हंगामात आरसीबी प्ले ऑफपर्यंत पोहचला-
2024 च्या आयपीएलमध्ये आरसीबीने सुपर-4 मध्ये प्रवेश केला होता. बंगळुरुने सलग 6 सामने जिंकून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले. मात्र, सुपर-4मध्ये पोहोचल्यानंतर एलिमिनेटर सामन्यात संघाला राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी या संघाने सलग 6 सामने गमावले होते, त्यामुळे आरसीबीचा संघ बाहेर पडणार असल्याचं जवळपास निश्चित झाले होते, मात्र त्यानंतर संघाने पुढील सलग 6 सामने जिंकून सुपर-4 मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार?
2022 च्या लिलावाप्रमाणे, मेगा लिलाव देखील 2 दिवसांसाठी आयोजित केला जाऊ शकतो. 2022चा लिलाव फेब्रुवारीमध्ये झाला होता, तर पुढील 2 वर्षांसाठी ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यात झाली होती. अशा परिस्थितीत, मेगा लिलावाची तारीख डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान ठेवली जाऊ शकते. 2022 मध्ये झालेला शेवटचा मेगा लिलाव बंगळुरूमधील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण 2023 आणि 2024 चे लिलाव अनुक्रमे केरळ आणि यूएईमध्ये झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच लिलावासाठी ठिकाणाचे नाव जाहीर करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
20 टक्के रक्कम वाढण्याची शक्यता
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, सर्व 10 फ्रँचायझींच्या मालकांनी बीसीसीआयकडे पगाराची मर्यादा 20 टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केलीय. 2023 ते 2024 पर्यंत पगाराची मर्यादा 5 टक्क्यांनी वाढवण्यात आली . म्हणजे 95 कोटींवरून 100 कोटींवर करण्यात आली होती. आता यामध्ये 20 टक्के आणखी वाढ करण्याची मागणी कऱण्यात आली आहे. IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी पगाराची मर्यादा किमान 10 टक्क्यांनी वाढू शकते असा अंदाज आहे. म्हणजेच 10 संघांची एकूण पगाराची मर्यादा पाहिल्यास रक्कम 10 अब्ज रुपयांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे.