IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2021 च्या 14 व्या सीजनसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडणार आहे. यावेळी एकूण 292 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. आयपीएल 2021 च्या लिलावासाठी एकूण 1097 खेळाडूंनी नोंदणी केली होती, परंतु आठही संघांच्या फ्रँचायजींनी एकूण 292 खेळाडूंची यादी शॉर्टलिस्ट केली आहे. यावर्षी लिलावात कोणत्या पाच खेळाडूंवर जास्त बोली लागू शकते, पाहुयात.


डेव्हिड मलान


आयसीसी टी -20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज डेव्हिड मलानरवर यावर्षी लिलावात मोठी बोली लागू शकते. या फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या या खेळाडूची कामगिरी दमदार आहे. मलानने इंग्लंडकडून 19 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 53.44 च्या सरासरीने आणि जवळपास 150 च्या स्ट्राइक रेटने 855 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे.


IPL 2021: 292 खेळाडूंच्या नावे बोली लागणार, सचिनचा मुलगा अर्जुनला मिळणार इतके रुपये


स्टीव्ह स्मिथ


राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2021 च्या लिलावाआधी कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिलीज केले आहे. आयपीएल 2020 च्या 14 सामन्यात स्मिथने 311 धावा केल्या होत्या. आता आयपीएल 2021 मध्ये, तो सर्वाधिक किमतीला विकला जाऊ शकतो. आयपीएल कारकीर्दीत स्मिथने 95 सामन्यांत 35.34 च्या सरासरीने 2333 धावा केल्या आहेत. यात एका शतकाची समावेश आहे.


ग्लेन मॅक्सवेल


ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलसाठी आयपीएल 2020 चा सीजन खराब ठरला. संपूर्ण मोसमात त्याला एकही षटकार ठोकता आला नाही. आयपीएल 2020 च्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने मॅक्सवेलला 10.75 कोटी रुपयात विकत घेतले होते. जरी तो अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन करू शकला नाही, परंतु तरीही तो यावेळी सर्वात महाग विकला जाऊ शकतो.


IPL मधील कमाईत महेंद्रसिंग धोनी अव्वल, 150 कोटींचा आकडा पार करणारा पहिला खेळाडू


नॅथन कुल्टर नाईल


ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईल याला टी -20 क्रिकेट स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणतात. गेल्या मोसमातील लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला आठ कोटींच्या मोबदल्यात विकत घेतलं होतं. पण कुल्टर नाईल अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही आणि म्हणूनच मुंबईने त्याला रिलीज केलं. मात्र या हंगामात पुन्हा एकदा त्याला कोट्यवधींची बोली लागू शकते.


ख्रिस मॉरिस

दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंग ऑलराऊंडर ख्रिस मॉरिस रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल 2020 च्या लिलावात 10 कोटी रुपयांना विकत घेतलं. मात्र मॉरिस आरसीबीकडून अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. आयपीएल 2020 मध्ये मॉरिसने 9 सामन्यांत केवळ 34 धावा आणि 11 गडी बाद केले. गेल्या मोसमात मॉरिस आपली क्षमता दाखवू शकला नसला, तरीही संघ लिलावात त्याच्यासाठी मोठा पैसा खर्च करु शकतात.