Indian U-17 women's Football Team: लैंगिक छळाच्या आरोपानंतर एलेक्स एम्बोसची (Alex Ambrose) भारतीय फुटबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे सदस्य डॉ. एसवाय कुरेशी (S.Y.Quraishi) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिलीय.
ट्वीट-
डॉ. एसवाय कुरेशी काय म्हणाले?
"अंडर-17 महिला संघाचे सहाय्यक मुख्य प्रशिक्षक अॅलेक्स अॅम्ब्रोस यांना लैंगिक छळ केल्याप्रकरणी पदावरून बडतर्फ करण्यात आलं आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे", अशा आशयाचं ट्वीट डॉ. एसवाय कुरेशी यांनी केलंय. सीओएनं 30 जून रोजी अॅलेक्स अॅम्ब्रोसला पदावरून हटवण्याचे संकेत दिले होते. परंतु त्यावेळी त्यांचं नाव उघड करण्यात आलं नव्हतं. "अंडर-17 भारतीय महिला फुटबॉल संघात गैरवर्तनाचा प्रकार घडलाय. सध्या हा संघ युरोप दौऱ्यावर आहे. प्राथमिक कारवाई म्हणून फेडरेशननं पुढील चौकशीपर्यंत संबंधित व्यक्तीला तात्पुरतं निलंबित केलंय", अशी माहिती देण्यात आलीय.
भारतीय खेळात लैंगिक छळाच्या घटनेत वाढ
दरम्यान, भारतीय खेळात अनेक लैंगिक छळाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच एका महिला सायकलपटूनं स्लोव्हेनिया दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षकावर अनुचित वर्तन केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यापूर्वी महिला सेलरनंही विदेशी दौऱ्यात तिच्या प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले होते.
भारताकडं अंडर-17 फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद
भारतात यावर्षी आक्टोबर महिन्यात अंडर-17 फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील सामने तीन शहरात म्हणजेच भुवनेश्वर, गोवा आणि नवी मुंबईमध्ये खेळवले जाणार आहे. येत्या 11 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर, अखेरचा सामना 30 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेतील 'अ' गटात भारतासह यूएसए, मोरक्को आणि ब्राझील यांचा समावेश करण्यात आलाय.
हे देखील वाचा-