India tour of England: बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर (Edgbaston) सुरु असलेल्या रिशेड्युल कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहचला आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. भारतानं दुसऱ्या डावात 257 धावांची आघाडी मिळवली आहे. दरम्यान, इंग्लंडच्या पहिल्या डावात जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) शतक झळकावून संघाचा डाव पुढं नेला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) स्लेजिंगमुळं पुजारासारखा खेळणारा जॉनी बेअरस्टो पंत बनला, असं वक्तव्य भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं (virender Sehwag) केलंय.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पण विराट कोहलीसोबतच्या लढतीनंतर जॉनी बेअरस्टोची फलंदाजीची भूमिका पूर्णपणे बदलल्याचे सेहवागनं म्हटलं आहे. "विराट कोहलीनं स्लेजिंग करण्यापूर्वी जॉनी बेअरस्टोचा स्ट्राइक रेट 21 होता, पण स्लेजिंगनंतर 150 झाला, विनाकारण स्लेजिंग करून विराट कोहलीनं पुजारा सारख्या खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोला पंत बनवले", असं सेहवागनं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय.
वीरेंद्र सेहवागचं ट्वीट-
जॉनी बेअरस्टोचं शतक
बर्मिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला जॉनी बेअरस्टोनं 60 चेंडूत फक्त 13 धावा केल्या होत्या. परंतु, विराटसोबत झालेल्या वादानंतर त्यानं 53 चेंडूत 73 धावा केल्या. काही वेळातच जॉनी बेअरस्टोचा स्ट्राइक रेट 150 च्या पुढं गेला. जॉनी बेअरस्टोनं या डावात 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 106 धावा केल्या.
जॉनी बेअरस्टो इंग्लंडसाठी तारणहार ठरला
या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 416 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांवर संपुष्टात आला. जॉनी बेअरस्टोच्या शतकाशिवाय इंग्लंडला एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
हे देखील वाचा-