India vs Northamptonshire: भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे एकीकडे कसोटी सामना सुरू आहे. तर, दुसरीकडं भारताचा फलंदाज दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात भारतीय संघानं दुसऱ्या टी-20 सराव सामन्यात नॉर्थहॅम्प्टनशायरचा 10 धावांनी पराभव केलाय. भारताच्या विजयात हर्षल पटेलनं महत्वाची भूमिका बजावलीय. फलंदाजीसह त्यानं गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करून दाखवली. सराव सामन्यातील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे.


हर्षल पटेलची चमकदार कामगिरी
या सामन्यात नॉर्थहॅम्प्टनशायरनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन 0, इशान किशन 16, राहुल त्रिपाठी 7, सूर्यकुमार यादव 0 धावा करून माघारी परतले. कर्णधार दिनेश कार्तिकनं 34 धावांची खेळी खेळली, ज्यात तीन चौकार आणि एक षटकार होता. दरम्यान, भारताच्या कठीण काळात  झंझावाती अर्धशतक ठोकून हर्षल पटेल हिरो ठरला. हर्षल पटेलनं सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत 36 चेंडूत 54 धावा केल्या. ज्यात पाच चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. भारतानं 20 षटकात आठ विकेट्स गमावून नॉर्थहॅम्प्टनशायरच्या संघासमोर 150 धावांचं लक्ष्य ठेवलं. 


नॉर्थहॅम्प्टनशायरचा संघ 139 धावांवर ऑलआऊट
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उरलेल्या नॉर्थहॅम्प्टनशायरचा संघ 139 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून अर्शदीप सिंह, आवेश खान, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, प्रसिद्ध कृष्णा आणि व्यंकटेश अय्यर यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.


इंग्लंडविरुद्ध भारताची टी-20 आणि एकदिवसीय मालिका कधी?
भारतीय संघाला येत्य 7 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. 7, 9 आणि 10 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामने खेळले जाणार आहेत. तर 12, 14 आणि 17 जुलै रोजी एकदिवसीय सामने खेळवले जातील.


हे देखील वाचा-