South Africa Tour of India : आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेला भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी आज मुंबईमध्ये भारतीय संघाची निवड होणार आहे. यामध्ये आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला संधी मिळू शकते. यात दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या यांचे नाव आघाडीवर आहे.
दीपक चाहर, सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकाविरोधात खेळताना दिसणार नाहीत. दक्षिण आफ्रिकाविरोधात होणाऱ्या टी 20 मालिकेसाठी आज 22 मे रोजी भारतीय संघाची निवड होणार आहे. मुंबईमध्ये बीसीसीआय निवड समिती याबाबतचा निर्णय घेणार आहे. यामध्ये अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी मिळू शकते.
रोहित-विराटला आराम? -
भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात पाच सामन्याची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताच्या दिग्गज खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता आहे. वर्कलोड मॅनेज करण्याच्या दृष्टीकोणातून बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचे समजतेय. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, विकेटकिपर ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल यांना दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आराम मिळणार आहे.
हार्दिक पांड्याकडे नेतृत्व?
दक्षिण आफ्रिकाविरोधातील मालिकेतून भारतीय संघात पुन्हा अष्टपैलू हार्दिक पांड्या पुनरागमन करण्यास सज्ज झालाय. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे हार्दिक पांड्याने यशस्वी नेतृत्व केले. हार्दिकच्या नेतृत्व गुणांनी सर्वांनाच प्रभावित केलेय. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरोधातील टी 20 मालिकेत रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्याची शक्यताही पीटीआयने वर्तवली आहे. त्याशिवाय पंजाबचा सलामी फलंदाज शिखर धवनही कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे.
मोहसीन खान - उमरान मलिकला संधी -
हैदराबादचा वेगवान मारा उमरान मलिक आणि लखनौचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान यांना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये या दोन्ही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणार
भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे.
भारत- दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक-
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 9 जून | दिल्ली |
दुसरा टी-20 सामना | 12 जून | कटक |
तिसरा टी-20 सामना | 14 जून | विशाखापट्टनम |
चौथा टी-20 सामना | 17 जून | राजकोट |
पाचवा टी-20 सामना | 19 जून | बंगळुरू |
दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.