Team India Cricketer Umesh Yadav :  भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याची 44 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. नागपूरचा असणारा उमेश यादव सध्या न्यूझीलंडविरुद्ध संघात सहभागी नाही. त्याला त्याच्या नागपूरच्या एका मित्रानेच हा गंडा घातला आहे. उमेश यादव याचा मित्र जो त्याचा जुन्या मॅनेजर होता, त्यानेच ही फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. शैलेश ठाकरे असं आरोपीचं नाव आहे.


प्लॉट घेऊन देतो म्हणून आरोपी शैलेश ठाकरे याने उमेश यादव कडून 44 लाख घेतले होते. मात्र आरोपीने परस्पर स्वतःच्या नावाने प्लॉटची खरेदी करून घेतली. ज्यामुळे उमेशची 44 लाखांची फसवणूक झाली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात आरोपी शैलेश ठाकरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आधी होता मॅनेजर, आता घातला गंडा


समोर येणाऱ्या माहितीनुसार क्रिकेटर उमेश यादव याने 2014 मध्ये शैलेश ठाकरे याच्याकडे त्याचे सर्व आर्थिक, मालमत्ता आणि खाती व्यवस्थापित करण्याची जबाबदारी सोपवली होती. म्हणजेच उमेशचे सगळे आर्थिक व्यवहार शैलेश हा पाहत होता. पण एक वर्षाच्या कालावधीत, ठाकरे याने उमेशनं सोपवलेलं एकही काम योग्यपणे सांभाळलं नाही. त्यात उमेशने मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोराडी येथील एमएसईबी कॉलनी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्यातून ठाकरे याच्या खात्यात 44 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. पण याच गोष्टीत ठाकरेने यादवची फसवणूक केली. यादव याच्या तक्रारीनुसार ठाकरे याने ही रक्कम हडप करून स्वत:च्या नावावर मालमत्ता खरेदी केली होती. यादवने ठाकरेला पैसे परत करण्यास सांगितले असता ठाकरे परतफेड करण्यास किंवा यादव याच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करण्यास तयार नव्हता, त्यामुळे अखेर उमेश यादवने नागपूरच्या कोराडी पोलीस ठाण्यात आरोपी शैलेश ठाकरेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील हा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु केला आहे. या
प्रकरणाचा तपास करत असलेले अमितेश कुमार यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे.


हे देखील वाचा-