लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत बुधवारी पहिला सामना खेळत आहे. वर्ल्डकपसाठी जो भारतीय संघ निवडण्यात आला आहे, त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा आहे. असे असतानाही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करत असल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीचा जगातला सर्वोत्तम फलंदाज फलंदाजी सोडून गोलंदाजीचा सराव करतोय, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे दोन वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्या जोडीला भुवनेश्वर कुमारच्या रुपाने भारताला स्विंग गोलंदाजदेखील मिळाला आहे. हार्दिक पंड्या आणि विजय शंकरसारखे मध्यमगती गोलंदाजही आहेत. सध्या जोरदार फॉर्ममध्ये असलेले कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजासारखे फिरकीपटूदेखील आहेत. त्यासोबत केदार जाधव आणि रोहित शर्मासुद्धा कामचलाऊ गोलंदाज आहेत. असा गोलंदाजांचा तोफखाना असूनही कोहली गोलंदाजीचा सराव का करतोय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

विराट कोहली हादेखील कामचलाऊ गोलंदाजी करतो, हे अनेकदा आपण पाहिले आहे. भारताकडे रोहित शर्मा हा एक ऑफ स्पिनर (कामचलाऊ) आहे. परंतु भारताला या वर्ल्डकपमध्ये ऑफ स्पिनर गोलंदाजाची गरज भासू शकते. अशा वेळी भारताकडे एखादा पर्याय उपलब्ध असावा, यासाठीच विराट कोहली नेट्समध्ये ऑफ स्पिन गोलंदाजीचा सराव करत असल्याचे बोलले जात आहे.

विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजी करत नाही. पंरतु आतापर्यंत कामचलाऊ गोलंदाजी करताना विराटने एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 4-4 बळी घेतले आहेत. त्यामुळे विराटने वर्ल्डकपमधील एखाद्या सामन्यात गोलंदाजी केली, त्याचबरोबर विकेटही घेतली तर त्याचे नवल वाटायला नको.

गोलंदाजीचा सराव करत असतानाचा विराटचा व्हिडीओ पाहा