Pravin Tambe : क्रिकेटवेड्या भारतात अगदी लहाणांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण क्रिकेटसाठी वेडे आहेत. क्रिकेट बघणाऱ्यांप्रमाणे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तर अशाच भारतात अगदी 16 वर्षाचा असताना सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज पदार्पण करत असेल तर 41 वर्षाच्या वयातही एक खेळाडू पदार्पण करताना दिसून आला आहे. हा खेळाडू म्हणजे लेग स्पीनर प्रवीण तांबे. 


शिवाजी पार्कच्या मैदानात क्रिकेटचे धडे गिरवलेल्या प्रवीणची हीच कथा आता सिनेमाच्या माध्यमातून पाहता येणार आहे. जयप्रद देसाई (Jayprad Desai) यांनी दिग्दर्शित केलेला कौन प्रवीण तांबे हा सिनेमा लवकरच हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याच निमित्ताने प्रवीण तांबे नेमका कोण? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रवीण तांबे हा असा क्रिकेटपटू आहे ज्याने 41 वर्षाचा असताना प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएल आणि रणजी चषकात प्रवीण 2013 साली पहिला सामना खेळला होता. दरम्यान 8 ऑक्टोबर, 1971 साली मुंबई नगरीत जन्माला आलेल्या प्रवीणला आदी वेगवान गोलंदाज व्हायचं होतं. पण काही वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार त्याने फिरकी गोलंदाजी सुरु केली. शिवाजी पार्क जीमखाना संघातून खेळताना दिग्गज फलंदाज संदीप पाटील यांना प्रवीणची गोलंदाजी खास आवडली होती. दरम्यान असं असतानाही प्रवीणला आयपीएल किंवा रणजी संघात येण्यासाठी बरीच वर्ष वाट पाहावी लागली.


अखेर 2013 साली राजस्थान रॉयल्स संघात तर रणजी स्पर्धेत मुंबई संघात प्रवीणचं सिलेक्शन झालं. इतक्या वर्ष संधी न मिळता अखेर एका मोठ्या क्रिकेट लीगमध्ये संधी मिळणं ही एक भारी गोष्ट आहे, असं दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड प्रवीण बद्दल एका मुलाखतीत म्हटला आहे. प्रवीणने 5 मे  2014 साली केकेआरविरुद्ध हॅट्रीक देखील घेतली होती. 2017 मध्ये हैद्राबाद संघात प्रवीण होता. तर 2020 साली केकेआरने प्रवीणला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. यंदा मात्र त्याला कोणत्याच संघाने विकत घेतलेलं नाही. तरी देखील 2020 साली त्रिबांगो नाईट रायडर्स या कॅरीबियन प्रिमीयर लीगमधील संघाने प्रवीणला विकत घेतल्याने कॅरीबियन प्रिमीयर लीग अर्थात CPL खेळणारा प्रवीण पहिला-वहिला खेळाडू ठरला आहे. 


सिनेमाच्या रुपात प्रवीणला जाणून घ्या


'कौन प्रवीण तांबे?' हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. 9 मार्चला या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयस जवळपास 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी तो ‘इक्बाल’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रवीण तांबेंची भूमिका साकारण्यासाठी श्रेयसने खूप मेहनत घेतली आहे. प्रवीण तांबेच्या भूमिकेबद्दल श्रेयस म्हणाला, मी खूप भाग्यवान आहे. मला मोठ्या पडद्यावर प्रवीणची भूमिका साकारायला मिळत आहे. जयप्रद देसाई यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. श्रेयससोबत या सिनेमात आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटीलदेखील मुख्य भूमिकेत आहेत.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha