Parthiv Patel Retires : टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि फलंदाज पार्थिव पटेलनं वयाच्या 35व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पार्थिव पटेलनं 2018 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. 2002मध्ये वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी पार्थिव पटेलनं टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पार्थिव पटेल या वर्षी आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघामध्ये होता. परंतु, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.


पार्थिव पटेलनं ट्विटरवर ट्वीट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. पार्थिव पटेलंनं लिहिलं की, "मी आज माझ्या 18 वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा करत आहे. बीसीसीआयने माझ्यावर विश्वास दाखवत वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मला दिली. बीसीसीआयने ज्याप्रकारे माझी साथ दिली, त्यासाठी नेहमीच आभारी राहिल."





ज्या कर्णधारांच्या नेतृत्त्वात तो टीम इंडियासाठी खेळला होता, त्या सर्व टीम इंडियाच्या कर्णधारांचे पार्थिव पटेलनं आभार मानले आहेत. माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे त्याने खासकरुन आभार मानले असून पार्थिव म्हणाला की, "दादांचा मी नेहमीच आभारी असीन. एक कर्णधार म्हणून गांगुली नेहमीचं माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांच्यासोबत टीम इंडियासाठी खेळणं हे माझं सौभाग्य होतं."


पार्थिव पटेल याने कुटुंबाला वेळ देण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे. पार्थिव पटेलचं म्हणणं आहे की, त्याने एक क्रिकेटर म्हणून आपलं आयुष्य जगलं आहे आणि त्याच्यावर आता वडील म्हणून काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या त्याला आता पार पाडायच्या आहेत.


17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण


पार्थिव पटेलच्या नावावर टीम इंडियासाठी विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून सर्वात कमी वयात डेब्यू करण्याचा रेकॉर्ड आहे. पार्थिव पटेलनं टीम इंडियासाठी 25 कसोटी सामने खेळले असून 31.13 च्या सरासरीने 934 धावा केल्या आहेत. तसेच आतापर्यंत त्याने 6 अर्धशतकं फटकावली आहेत.


टीम इंडियामध्ये 'धोनी युग' सुरु झाल्यामुळे पार्थिव पटेलला जास्त संधी मिळाली नाही. 38 एकदिवसीय सामन्यांमध्ये पार्थिवने चार अर्धशतकं फटकावत 962 धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी पार्थिवने दोन ट्वेंटी-ट्वेंटी सामनेही खेळले आहेत.


पार्थिव पटेलचं आयपीएलमधील प्रवास तसा बराच मोठा होता. आयपीएलमध्ये ओपनिंग फलंदाज म्हणून खेळणाऱ्या पार्थिवने 139 सामन्यांमध्ये 137 डावांमध्ये 22.5 च्या सरासरीसह आणि 120.78 च्या स्ट्राइक रेटसह 2358 धावा केल्या आहेत. पार्थिवने आपल्या आयपीएल करिअरमध्ये 13 अर्धशतकं फटकावली आहेत.


2018 मध्ये पटेलने दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आयपीएलमध्ये गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर बंगलोरसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पार्थिव पटेलचा समावेश होता. परंतु, यावर्षी आरसीबीकडून सामना खेळण्याची संधी पार्थिवला मिळाली नाही.