IND vs AUS | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-ट्वेंटी सीरीजमध्ये टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने उत्तम खेळी केली आहे. पांड्याने लिमिटेड ओव्हर्सच्या सीरीजमध्ये 288 धावा केल्या आणि त्याने ट्वेंटी-ट्वेंटी सीरीजमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबही पटकावला. हार्दिक पांड्याच्या शानदार खेळीनंतर त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यासाठीही संघात स्थान देण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. परंतु, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पांड्याला कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


पांड्याचा सध्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघामध्ये समावेश नसणार आहे. विराट कोहलीचं म्हणणं आहे की, हार्दिक पांड्या ऑलराऊंडर म्हणूनच कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान मिळवू शकतो.


गेल्या वर्षी दुखापतग्रस्त झाल्यानंतर हार्दिक पांड्याने अत्यंत कमी सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे. 27 वर्षीय हार्दिक पांड्याने मर्यादित ओव्हर्समध्ये आतापर्यंत केवळ चार ओव्हर्सची गोलंदाजी केली आहे. तसेच त्याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही गोलंदाजी केली होती. असं असलं तरी पांड्या गोलंदाजीमध्ये खास प्रदर्शन करु शकलेला नाही.


पांड्याची गोलंदाजी महत्त्वाची


विराट कोहली म्हणाला की, "हार्दिक पांड्या उत्तम खेळाडू आहे. आम्हाला एक असा खेळाडू मिळाला आहे जो आमच्यासाठी मॅच फिनिश करु शकतो. परंतु, टेस्ट क्रिकेट एक वेगळ्या प्रकारचं आव्हान आहे. कसोटी सामना संतुलित ठेवण्यासाठी आम्हाला त्याच्याकडून गोलंदाजी करुन घेण्याची गरज आहे." पुढे बोलताना विराटने पांड्यानं गोलंदाजी करणं ही संघाची गरज असल्याचं सांगितलं आहे. तो म्हणाला की, "जर तुम्ही पाहिलं असेल तर दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यावर पांड्याच्या गोलंदाजीमुळे टीममध्ये संतुलन राहिलं होतं. त्यामुळे तो ऑलराऊंडर म्हणूनच टेस्ट खेळू शकतो."


हार्दिक पांड्याने तिसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीसोबत 44 धावांची भागीदारी करत 20 धावा केल्या, दुसऱ्या टी20मध्ये पांड्याने नाबाद 42 धावा करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला होता. मायदेशी परतणार असून कसोटी मालिकेत सहभागी होणार नसल्याचं हार्दिक पांड्याने सामन्यानंतर स्वतःही सांगितलं आहे. पांड्याने याआधी 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर कसोटी सामना खेळला होता.


महत्त्वाच्या बातम्या :