अॅडलेड : ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळं वॉर्नरला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली पहिली कसोटी 17 डिसेंबरपासून अॅडलेड येथे दिवसरात्र खेळवण्यात येणार आहे.



डेव्हिड वॉर्नरला कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक फिटनेसची उंची गाठण्यासाठी आणखी 10 दिवस मेहनत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं आता पहिल्याऐवजी दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याचं वॉर्नरचं लक्ष्य राहिल. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली दुसरी कसोटी मेलबर्नमध्ये 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येईल.


भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत 29 नोव्हेंबर रोजी सिडनीत झालेल्या दुसऱ्या वन डेदरम्यान वॉर्नरला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळं त्याला तिसऱ्या वन डेसह तीन ट्वेन्टी२० सामन्यांच्या मालिकेतूनही माघार घ्यावी लागली होती. पण आता वॉर्नर आवश्यक फिटनेसअभावी पहिल्या कसोटी सामन्यातही खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं तो ऑस्ट्रेलिया संघासह अॅडलेडला रवाला होणार नाही. त्याऐवजी वॉर्नर सिडनीमध्येच राहून फिटनेसवरची मेहनत आणि वैद्यकीय उपचार सुरु ठेवेल.


डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत विल पुकोवस्कीला अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी आहे. पण भारतीय संघाविरुद्धच्या तीनदिवसीय सामन्यात झालेल्या दुखापतीमुळं पुकोवस्कीला घेरी आली होती. त्यातून तो सावरला असेल तरच तो अॅडलेडच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकेल.