IND vs ENG 3rd Test: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 25 धावा काढल्या तर शुभमन गिलने 21 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावांवर नाबाद राहिला.


दोन दिवसांत कसोटी सामना आटोपण्याची 22वी वेळ
मोटेरा येथे खेळला गेलेला हा कसोटी सामना दुसर्‍याच दिवशी संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहास दोन दिवसांत सामन्याचा निकाल येण्याची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही 22वी वेळ आहे. विशेष म्हणजे, यामध्ये इंग्लंडचा 13 वेळा सहभाग होता. या 13 सामन्यात इंग्लंडचा चार वेळा पराभव झाला आहे.


अक्षर पटेल भारतीय संघाच्या विजयाचा हीरो
भारताच्या या शानदार विजयाचा अक्षर पटेल नायक ठरला. आपला दुसरी कसोटी सामना खेळताना अक्षर पटेलने या कसोटीच्या दोन्ही डावात पाच विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 38 धावा देऊन सहा विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात त्याने 32 धावा देऊन पाच बळी घेतले. यासह, तो दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.


INDvsENG 3rd Test : अक्षर पटेलने रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा गोलंदाज


अश्विनन्या कसोटीतील 400 विकेट पूर्ण
या कसोटीत सात बळी घेणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 बळी पूर्ण केले. कसोटी सामन्यात असा पराक्रम करणारा तो भारताचा चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनी कसोटीत 400 बळी घेतले आहेत. अश्विनने 77 सामन्यांत एका कसोटी सामन्यात 25.01 च्या सरासरीने आणि २2.83 च्या इकॉनॉमी रेटने 400 बळी घेतले आहेत. यासह, कसोटीतील वेगवान 400 विकेट्स घेणारा जगातील दुसरा गोलंदाज बनला आहे. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनचा समावेश आहे.


सामन्यावर धावती नजर
या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 112 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 145 धावा करू शकला. अशाप्रकारे पहिल्या डावात भारताने 33 धावांची आघाडी मिळवली होती. यानंतर इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात 81 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला 49 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारतीय संघाने कोणत्याही विकेट न गमावता 7.4 षटकांत पूर्ण केले.