India Tour Of Zimbabwe: अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमदनं (Shahbaz Ahmed) झिम्बाब्वेविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय मालिकेत निवड झाल्याबद्दल आनंद  व्यक्त केलाय. रणजी ट्रॉफी आणि  आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी त्यानं केलेल्या प्रभावी कामगिरीनंतर निवडकर्त्यांनी झिम्बाब्वे दौऱ्यात  त्याची भारतीय संघात निवड केलीय. या मालिकेला येत्या 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. महत्वाचं म्हणजे, भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर खांद्याच्या दुखापतीमुळं भारतीय संघातून बाहेर पडलाय. ज्यामुळं शाहबाज अहमदला संघात स्थान देण्यात आलंय. भारताच्या एकदिवसीय संघात निवड झाल्यानंतर शाहबाज अहमदनं आपली प्रतिक्रिया दिलीय.  


शाहबाज अहमद काय म्हणाला?
"प्रत्येकाला भारताची जर्सी घालून देशासाठी क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. भारतीय संघानं मला संधी दिली आणि माझं स्वप्न साकार झालं. बंगालच्या संघानं माझ्यावर विश्वास ठेवला. या संघातून खेळल्यानंतर माझ्या आयुष्यात मोठा बदल झाला. भारतासाठी खेळताना मी माझे शंभर टक्के देईल."


शाहबाज अहमद कोण आहे?
शाहबाज अहमद देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळतो. त्यानं भारतीय ए संघाचंही प्रतिनिधित्व केलंय. पण आता त्याला भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाकडून कॉल आलाय. शाहबाज हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकल्यास तो प्रभावी ठरला आहे. शाहबाजनं प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1 हजार 41 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याच्या नावावर 57 विकेट्सचीही नोंद आहे. शाहबाजनं लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 662 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि दोन अर्धशतकांसह 14 विकेट्सची नोंद आहे. एवढेच नव्हे तर, त्यानं आयपीएलमध्येही 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबत 279 धावा केल्या आहेत.


झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघ भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर शाहबाज अहमद.


केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय खेळाडू उतरणार मैदानात
इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमी नमवून भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलाय. येत्या 18 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने हेरारे स्पोट्स क्लबमध्ये खेळले जाणार आहे. महत्वाचं म्हणजे, झिम्बाब्वे दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. ज्यामुळं भारताचा सलामीवीर केएल राहुलकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय. केएल राहुलनं याआधीही भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. परंतु, केएल राहुलच्या नेतृत्वात भारताला एकही सामना जिंकता आला नाहीये. यामुळं झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघ कशी कामगिरी करतोय? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


हे देखील वाचा-