Mukesh Kumar Test Debut : वेस्ट इंडिजविरोधात दुसऱ्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याचं पदार्पण झालेय. शार्दुल ठाकूर याच्या जागी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.  मुकेश कुमार याचा भारतीय संघापर्यंत पोहचण्याचा प्रवास कठीण होता. लहानपणी मुकेश कुमार याच्या क्रिकेट खेळण्याला त्याच्या वडिलांचा विरोध होता. पण मुकेश कुमार डगमगला नाही.. तो क्रिकेट खेळत राहिला. मुकेश कुमार पाचशे रुपयांसाठी टेनिसबॉल क्रिकेट खेळत राहिला. यंदा झालेल्या आयपीएलमध्ये मुकेश कुमार याने दिल्लीच्या संघासाठी दमदार कामगिरी केली. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर मुकेश कुमार याला भारतीय संघात स्थान मिळाले.


मुकेशचे वडील काशिनाथ सिंह त्याच्या क्रिकेट खेळण्याच्या विरोधात होते. मुकेश कुमार याने सीआरपीएफमध्ये सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती. 2019 मध्ये मुकेश कुमार याच्या वडिलांचे निधन झाले. मुकेश सीआरपीएफच्या परीक्षेत दोनदा नापास झाला आणि बिहारच्या अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याची क्रिकेट कारकीर्दही प्रगती करत नव्हती. त्यानंतर त्याने पश्चिम बंगालमध्ये 'खेप' क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो परवानगी नसलेल्या क्लबचे प्रतिनिधित्व करत असे, ज्यामध्ये त्याला प्रत्येक सामन्यासाठी 500 ते 5000 रुपये मिळत होते.










मुकेश कुमार कुपोषणाने त्रस्त होता आणि त्याला 'बोन एडेमा' देखील झाला होता. ज्यामध्ये त्याच्या गुडघ्यात खूप पाणी जमा होते, त्यामुळे तो सामना खेळू शकला नाही. मात्र बंगालचा माजी वेगवान गोलंदाज रणदेब बोस यांनी त्यांचे आयुष्यच बदलून टाकले. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या 'व्हिजन 2020' कार्यक्रमात रणदेब बोस यांनी मुकेश कुमारची प्रतिभा पाहिली. मुकेश चाचण्यांमध्ये अयशस्वी झाला असला तरी, बोस यांनी तत्कालीन CAB सचिव सौरव गांगुली यांचे मन वळवले. यानंतर संघाने मुकेशच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेतली आणि त्याचा एमआरआय करून त्याच्या वैद्यकीय खर्चाची व्यवस्था केली. त्यानंतर मुकेशने 2015-16 मध्ये हरियाणाविरुद्ध पश्चिम बंगालकडून पदार्पण केले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली. अचूक यॉर्कर टाकण्यात माहिर असलेला मुकेश आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला.