India Vs West Indies 100th Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान आजपासून (20 जुलै) दुसऱ्या कसोटीला सुरुवात होत आहे. त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओवल येथे हा सामना होणार आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना खास असेल.. कारण, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा 100 वा कसोटी सामना आहे. त्याशिवाय विराट कोहलीचा हा 500 आंतरराष्ट्रीय सामना असेल.


वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विडिंज खेळ उंचावण्याचा प्रयत्न करेल.  पहिल्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला होता. फलंदाज आणि गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले होते. तीन दिवसांमध्ये भारताने सामन्यात बाजी मारली होती. हा सामना भारताने एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या कसोटी सामना जिंकून क्लिन स्वीप देण्याच्या इराद्याने भारत मैदानात उतरले तर वेस्ट इंडिजचा संघ परतफेड करण्यासाठी खेळेल. पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने दीडशतकी खेळी केली होती. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा याने शतक तर विराट कोहलीने अर्धशतक झळकावले होते. गोलंदाजीत अश्विन याने 12 विकेट घेतल्या होत्या. तर रविंद्र जाडेजा यानेही भेदक मारा केला होता. 
  
हेड टू हेड रिकॉर्ड


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 99 सामने झाले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजने 30 सामन्यात बाजी मारली आहे तर भारताला 23 सामन्यात विजय मिळाला आहे. 46 सामने अनिर्णित राहिले आहेत. 


कधी आणि कुठे पाहाल सामना ?


दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहे. डीडी स्पोर्टस चॅनलवर लाईव्ह सामना पाहता येणार आहे. जिओ अॅपवर मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग असेल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्याबाबतचे अपडेट मिळतील.


विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना -


भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आतापर्यंत 499 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज होणारा सामना विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल.  इतके सामने खेळणारा विराट कोहली दहावा खेळाडू होणार आहे. भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक सामने खेळला आह. सचिन तेंडुलकरने  664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.


विराट कोहलीने आतापर्यंत 499 सामन्यातील 558 डावात फलंदाजी करताना 53.48 जबरदस्त सरासरीने 25461 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या नावावर 75 शतके आणि 131 अर्धशतके आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या   254* इतकी आहे.


सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंची यादी - 
सचिन तेंडुलकर- 664 सामने.
महेला जयवर्धने- 652 सामने.
कुमार संगाकारा- 594 सामने.
सनथ जयसूर्या- 586 सामने. 
रिकी पाँटिंग- 560 सामने.
महेंद्र सिंह धोनी- 538 सामने.
शाहिद आफ्रिदी - 524 सामने
जॅक कॅलिस- 519 सामने.
राहुल द्रविड- 509 सामने
इंजमाम उल हक- 500 सामने.
विराट कोहली- 499 सामने