IND vs WI 1st Test: रोहित शर्माने 421 धावांवर डाव घोषित केला आहे. वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखल्यानंतर भारताने पहिल्या डावात पाच विकेटच्या मोबदल्यात 421 धावा केल्या. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल (171) आणि रोहित शर्मा (103) यांनी शतकी खेळी केली. तर विराट कोहलीने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली.  भारताकडे सध्या 271 धावांची आघाडी आहे.  


अश्विन आणि जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर भाराताने वेस्ट इंडिजला पहिल्या डावा 150 धावांत रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी खोऱ्याने धावा चोपल्या. विशेषकरुन रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी प्रभावी कामगिरी केली. शुभमन गिल आणि अजिंक्य रहाणे यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. 


यशस्वी जयस्वाल याने पदार्पणातच 171 धावांची खेळी केली. या खेळीत यशस्वीने 16 चौकार आणि एक षटकार लगावला. तर रोहित शर्माने 103 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने दोन चौकार आणि दहा षटकार लगावले. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. पण शुभमनला मोठी खेळी करता आली नाही. शुभमन अवघ्या सहा धावा काढून तंबूत परतला. गिल तंबूत परतल्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा आणि गिल यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी 110 धावांची भागिदारी केली. अल्जारी जोसेफ याने यशस्वी जयस्वाल याला 171 धावांवर बाद करत वेस्ट इंडिजला आजच्या दिवसातील पहिले यश मिळवून दिले. यशस्वी बाद झाल्यानंतर भारताची सर्वात अनुभवी जोडी मैदानात होती. पण अजिंक्य रहाणेला संधीचे सोनं करता आले नाही. अजिंक्य रहाणे तीन धावांवर केमर रोचचा शिकार झाला.  






 


अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी डावाची सुत्रे हातात घेतली. विराट कोहली याने अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात विराट कोहली तंबूत परतला. विराट कोहलीने पाच चौकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. इशान किशन आणि रविंद्र जाडेजा काही काळ मैदानात स्थिरावले. पण रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला. इशान किशन पदार्पणाच्या सामन्यात एका धावेवर नाबाद राहिला. रविंद्र जाडेजा 37 धावांवर नाबाद होता. 


वेस्ट इंडिजची गोलंदाजी भारतीय फलंदाजामुळे दुबळी दिसत होती. वेस्ट इंडिजने भारताविरोधात नऊ गोलंदाजांचा वापर केला पण भारताच्या फलंदाजांना अडचणीत टाकण्यात अपयश आलेय. केमर रोच, अल्झारी जोसेफ, कार्निवॉल, वॉरिकॉन आणि अॅलिक यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.