IND vs SRI : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असून सोमवारी टीम इंडियाचे सर्व खेळाडू श्रीलंकेत दाखल झाले होते. श्रीलंकेसोबतच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला कोविड-19 नियमांतर्गत क्वॉरंटाईन रहावं लागणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामने खेळणार आहे. संघात 20 खेळाडू आणि 5 नेट गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. 


श्रीलंका क्रिकेट (एसएलसी)च्या अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं की, "भारतीय संघ सोमवारी चार वाजता कोलंबो येथे पोहोचला आणि त्यानंतर क्वॉरंटाईन झाला." कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वात आणि प्रशिक्षण राहुल द्रविड यांच्या नेतृत्त्वात टीम इंडिया श्रीलंका क्रिकेट संघासोबत पुढील महिन्यात तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी20 सामने खेळणार आहे.


एसएलसीनं दिलेल्या माहितीनुसार, "टीम इंडिया 23 जूनपासून 1 जुलैपर्यंत हॉटेलच्या रुममध्ये क्वॉरंटाईन असणार आहे. त्यानंतर त्यांना 2 ते 4 जुलैपर्यंत क्वॉरंटाईनमध्ये सराव करण्याची परवानगी देण्यात येईल. 5 जुलैपासून टीम इंडियाचा क्वॉरंटाईन कालावधी संपेल, मात्र बायो-बबलचे सर्व नियम त्यांना पाळावे लागतील. संघ व्यवस्थापनाच्या आदेशानुसार, त्यांना सर्व नियम पाळावे लागतील."



भारत-श्रीलंका सीरीजचं संपूर्ण शेड्यूल :


भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय मालिकेमधील पहिला सामना 13 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. तर दुसरा एकदिवसीय सामना 16 जुलै रोजी आणि तिसरा सामना 18 जुलै रोजी खेळवण्यात येईल. भारत आणि श्रीलंका यांच्या टी20 सीरीजची सुरुवात 21 जुलैपासून होणार आहे. 21 जुलै रोजी पहिला सामना, 23 जुलै रोजी दुसरा टी20 सामना, तर 25 जुलै रोजी तिसरा टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. हे सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. 


श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया


शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, ईशन किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के. गौतम, क्रुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.


नेट गोलंदाज : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि सिमरनजीत सिंह.


महत्त्वाच्या इतर बातम्या :