पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीम सामन्यांच्या मालिकेवर भारताने आपलं नाव कोरलं. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली. या मालिकेतील शेवटचा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 137 धावा केल्या. तर श्रीलंकेलाही 20 व्या षटकांपर्यत 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी या सामन्यात शेवटी सुपर ओव्हरचा थरार रंगला. तरीदेखील भारताने या सामन्यात विजयी कामगिरी केली. या विजयासह आता सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून दाखवलेले चुणूक आणि प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरने दाखवलेले कौशल्य याचे तोंडभरून कौतुक होत आहे.
टी-20 विश्वचषकानंतर संघात अनेक बदल
भारताने नुकतेच टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या विजयासह भरतीय पुरूष क्रिकेट संघात अनेक बदल केले. रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं तर स्टार फलंदाज विराट कोहलीदेखील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. या विजयासह राहुल द्रविड यांचीदेखील भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची कारकीर्द संपली. त्यानंतर आता श्रीलंकेविरोधातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला भारतीय संघांचे कर्णधार करण्यात आले. तर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली. या महत्त्वाच्या बदलांमुळे टीम इंडियाचा पहिलाच परदेश दौरा कसा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र टीम इंडियाने या बदलाला सार्थ ठरवत श्रीलंकेविरोधातील मालिका 3-0 ने जिंकली.
गौतम गंभीर यांचे संघाला मार्गदर्शन
राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरही टीम इंडियाला चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देऊ शकेल का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण श्रीलंकेविरोधातील मालिका विजयानंतर गंभीरने मी मुख्य प्रशिक्षकपदासाठी योग्य असल्याचा संदेश दिला आहे. 30 जुलै रोजी झालेल्या सामन्यात गौतमने सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण भारतीय संघाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे भारतीय संघाला विजय सोपा झाला.
सूर्यकुमार यादने दाखवली चुणूक
दुसरीकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड होईल, असा अंदाज लावला जात असताना ऐनवेळी कर्णधारपदाची माळ सूर्यकुमार यादवच्या गळ्यात पडल्या. त्यामुळे सूर्यकुमार या निवडीला सार्थ ठरणार का? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. पण सूर्यकुमारनेही आपल्यातला नेतृत्त्वगुण भारत-श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दाखवून दिला आणि 3-0 ने ही मालिका जिंकली. सूर्यकुमारने शेवटच्या सामन्यात ऐनवेळी सर्वांना चकित करणारे आणि अनपेक्षित निर्णय घेतले. हे निर्णय शेवटी योग्यच ठरले. त्याने रिंकू सिंहला गोलंदाजी करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे सामना निर्णायक वळणावर असताना त्यानेदेखील गोलंदाजी करून सामन्यात विजयी कामगिरी केली. सामना तसेच मालिका विजयासह सूर्यकुमारने आपल्या नेतृत्त्वगुणाची चुणूक दाखवून दिली आहे.
त्यामुळे आता या मालिका विजयामुळे गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी हीट ठरल्याचं म्हटलं जातंय. आगामी काळातही ही जोडी काय काय कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :