India vs Sri Lanka ODI : भारताने तीन टी-20 मालिकेत श्रीलंकेचा 2-1 ने पराभव केला. आता टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारीला होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू संघात पुनरागमन करणार आहेत. याशिवाय केएल राहुलही मैदानावर दिसणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याने कर्णधाराची भूमिका बजावली होती. मात्र, या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंशिवाय श्रीलंकेच्या काही खेळाडूंवर देखील सर्वांची नजर असणार आहे.


रोहित शर्मा - भारतीय संघाचा नियमित कर्णधार श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. यानंतर त्याला संघाबाहेर बसावे लागले. रोहित शर्माचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड तसा उत्कृष्ट राहिला आहे. त्यामुळे आता एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा कशी फलंदाजी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


विराट कोहली- श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराट कोहली संघाचा भाग नव्हता.दरम्यान, नुकताच कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत वृंदावनच्या आश्रमात दिसत होता. त्यामुळे आता विश्रांतीनंतर कोहली श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करत आहे. विराट कोहलीचा अलीकडचा फॉर्म उत्कृष्ट आहे. त्यामुळे भारताचा हा माजी कर्णधार श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आपला फॉर्म कायम ठेवू शकतो का, हे पाहावे लागेल.


केएल राहुल- भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलचा अलीकडचा फॉर्म चांगला नाही. विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याने सर्वांची मोठी निराशा केली. दरम्यान राहुल श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्यात राहुलने आतापर्यंतच्या कारकिर्दीत बहुतेक वेळा टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी केली आहे, त्यामुळे पाचव्या क्रमांकावर केएल राहुल कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.


वानिंदू हसरंगा - श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याच्यावरही अनेकांची नजर असेल. त्याच्या घातक गोलंदाजीशिवाय, वनिंदू हसरंगा फलंदाजीनेही सामना बदलू शकतो. वानिंदू हसरंगाची गणना अलीकडच्या काळातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते, पण भारताविरुद्धच्या मालिकेत वानिंदू हसरंगा संघासाठी सामना जिंकू शकेल का? हे पाहावे लागेल. भारत-श्रीलंका टी-20 मालिकेत वानिंदू हसरंगाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, त्यामुळे आता एकदिवसीय मालिकेत त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.


कुसल मेंडिस- कुसल मेंडिस त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, कुसल मेंडिसला भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत चांगली सुरुवात करुनही मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे आता एकदिवसीय मालिकेत पुन्हा फॉर्ममध्ये परतण्याचा त्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे.


हे देखील वाचा-