India vs South Africa 4th T20 Cancelled : मैदानात धुक्याची चादर आणि धोकादायक परिस्थितीमुळे भारत–दक्षिण आफ्रिका चौथा टी-20 सामना अखेर रद्द करण्यात आला, ज्यामुळे बीसीसीआयच्या नियोजनावर पुन्हा टीका होतं आहे. डिसेंबर महिना सुरू झाला की लखनऊ, दिल्लीसारख्या उत्तर भारतातील शहरांमध्ये दाट धुके आणि धूरची गंभीर समस्या निर्माण होते, हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही दरवर्षी याच काळात या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले जातात आणि परिणामी सामने उशिरा सुरू होणे, टॉस न होणे किंवा थेट सामना रद्द होण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढवते.
डिसेंबरमध्ये उत्तर भारतात सामने देण्यावर प्रश्नचिन्ह
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना लखनऊमध्ये रद्द झाल्यानंतर पुन्हा एकदा बीसीसीआयच्या नियोजन क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चाहत्यांचा आणि क्रिकेट तज्ज्ञांचा रोखठोक सवाल आहे की, डिसेंबरमध्ये उत्तर भारतात हवामान कसे असते याची पूर्ण कल्पना असतानाही असे सामने तिथे का ठेवले जातात?. क्रिकेटप्रेमींमध्ये ही भावना अधिक तीव्र आहे की हिवाळ्यातील सामने प्रामुख्याने दक्षिण भारतातील शहरांमध्ये आयोजित करायला हवेत. चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, तिरुवनंतपुरमसारख्या ठिकाणी या काळात हवामान तुलनेने स्थिर असते आणि सामने सुरळीत पार पडू शकतात.
बीसीसीआयच्या नियोजनावर पुन्हा टीका
खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असताना वारंवार अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे ही गंभीर बाब मानली जात आहे. ‘मूलभूत नियोजन इतकं अवघड नसावं,’ अशी स्पष्ट प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत असून बीसीसीआयने भविष्यात वेळापत्रक ठरवताना हवामानाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे. सामना रद्द होणे हे केवळ संघांसाठीच नाही, तर प्रेक्षक, प्रसारक आणि क्रिकेटच्या प्रतिमेसाठीही धक्का मानला जात असून, आता तरी बीसीसीआय यामधून धडा घेणार का, हा खरा प्रश्न आहे.
चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया
या प्रकरणावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने संतप्त शब्दांत म्हटलं की, “वर्षाच्या या काळात लखनऊ आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये दाट धुक्याची समस्या असते, हे बीसीसीआयला माहीत नव्हतं का? हा प्रकार म्हणजे जागतिक स्तरावरची नामुष्की आहे.” त्याच्या मते, या चुकीच्या नियोजनामुळे टी-20 वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघाला एक सामना कमी खेळावा लागला, जो तयारीच्या दृष्टीने मोठा धक्का आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने थेट बीसीसीआयच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “उत्तर भारतात हिवाळ्यात हवामान अत्यंत खराब असू शकतं, हे माहित असतानाही इथे सामने का ठेवले? नियोजन करताना डोकं कुठे होतं?” असा संतप्त सवाल त्याने केला.