Alex Carey DRS Controversy Aus vs Eng 3rd : ॲशेस मालिकेत वाद नसेल, असं कधीच होत नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यात अॅडलेडमध्ये पुन्हा एकदा तसाच मोठा गोंधळ उडाला असून, यावेळी इंग्लंड संघ थेट मॅच रेफरीकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहे. वादाचं कारण ठरलं आहे, ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर-फलंदाज अॅलेक्स कॅरी. कॅरी 72 धावांवर असताना जॉश टंगच्या चेंडूवर त्याच्याविरुद्ध कॅचसाठी जोरदार अपील झाली. इंग्लंडचा विकेटकीपर जेमी स्मिथ आणि गोलंदाज टंग दोघेही कॅरी नक्कीच आऊट असल्याबाबत ठाम होते. मात्र मैदानी अंपायरने त्याला नॉटआऊट दिलं.
इंग्लंडने तत्काळ रिव्ह्यू घेतला. स्निको (Snickometer) तपासण्यात आला, पण त्यात कॅरी नॉटआऊट ठरला. इथेच खरी गंमत आहे, कारण चेंडू कॅरीच्या बॅटपर्यंत पोहोचण्याआधीच स्निकोमध्ये हालचाल दिसली, आणि चेंडू बॅटजवळून जाताना मात्र कुठलाही सिग्नल नव्हता. यामुळे तिसऱ्या अंपायरने कॅरीला जीवनदान दिलं.
इंग्लंडचा संघ का संतापला?
इंग्लंडचा आक्षेप असा आहे की, स्निको तंत्रज्ञानातील त्रुटीमुळे त्यांना महत्त्वाची विकेट गमवावी लागली. विशेष म्हणजे, खुद्द अॅलेक्स कॅरीनेही कबूल केलं की, त्याला काहीतरी आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं आणि आपल्याला नशिबाची साथ मिळाली. एवढंच नाही तर, या मालिकेत स्निको चालवणाऱ्या कंपनीनेही चूक झाल्याचं मान्य केलं आहे.
स्निको ऑपरेटरची चूक मान्य
बीबीजी स्पोर्ट्स या कंपनीने स्पष्ट केलं की, कॅरीच्या प्रकरणात स्निकोमध्ये झालेली चूक ही ऑपरेटरची होती. ऑपरेटरने स्टंप माइकचा चुकीचा ऑडिओ निवडल्यामुळे चुकीचा सिग्नल दिसला, असं कंपनीने सांगितलं. या तांत्रिक गडबडीचा सर्वात मोठा फटका इंग्लंडलाच बसला. जीवनदान मिळाल्यानंतर अॅलेक्स कॅरीने थेट शतक झळकावलं. कॅरीने 106 धावांची दमदार खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 326 धावा केल्या. कॅरी त्या क्षणी आऊट झाला असता, तर कदाचित ऑस्ट्रेलियालाही 300 धावांचा टप्पा गाठता आला नसता. ॲशेसमधील हा वाद आता किती पुढे जाणार, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
हे ही वाचा -