India vs South Africa 2nd Test : जोहान्सबर्ग येथील वांडर्स क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेला कसोटी सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकासमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले आहे. तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून भारत मालिका विजयासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरा कसोटी सामना जिंकून दक्षिण आफ्रिका हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. भारतीय संघाने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने सकारात्मक सुरुवात केली आहे. त्यामुळे सामना कोण जिंकणार? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे. जोहान्सबर्ग येथील वांडर्स क्रिकेट ग्राऊंडवर चौथ्या डावात आतापर्यंत किती धावांच्या लक्षाचा यशस्वी पाठलाग झालाय, हे पाहूयात....
जोहान्सबर्ग येथील वांडर्स क्रिकेट ग्राऊंडवर आतापर्यंत 310 धावांचा यशस्वी पाठलाग झालाय. नोव्हेंबर 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाने हा कारनामा केला होता. आतापर्यंतचा या मैदानावरील हा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग होता. दुसऱ्या क्रमांकावरही ऑस्ट्रेलियाचाच संघ आहे. एप्रिल 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाने 294 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
जोहान्सबर्ग येथील वांडर्स क्रिकेट ग्राऊंडवर आतापर्यंत यजमान दक्षिण आफ्रिका संघाने आतापर्यंत सर्वात मोठा यशस्वी पाठलाग 2006 मध्ये केला आहे. न्यूझीलंडविरोधात खेळताना दक्षिण आफ्रिका संघाने 220 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्याशिवाय वेस्ट इंडिजविरोधात 1998 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाने 164 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. म्हणजेच, 2006 नंतर जोहान्सबर्ग येथील वांडर्स क्रिकेट ग्राऊंडवर या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाला 220 पेक्षा जास्त धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयश आले आहे. भारतीय संघाची जमेची बाजू म्हणजे, जोहान्सबर्ग येथील वांडर्स क्रिकेट ग्राऊंडवर या मैदानावर भारतीय संघ आतापर्यंत एकदाही पराभूत झालेला नाही.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांची गरज
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा दुसरा डाव आटोपला आहे. भारत 266 धावांवर सर्वबाद झाला असून त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांची गरज आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अनुभवी रहाणे आणि पुजारा यांनी अर्धशतकं झळकावली असून विहारीने नाबाद 40 धावा केल्यामुळे भारताने ही धावसंख्या उभारली आहे. आतापर्यंत सामन्यात प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करत पहिल्या दिवसाअखेर 1 विकेट गमावत 35 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर शार्दूलने आफ्रिकेचे तीन गडी पटापट बाद केले. पण त्यानंतर बावुमा आणि काईल या जोडीने डाव सावरला आणि धावसंख्या 160 च्या पुढे पोहोचवली. पण 162 धावांवर काईल बाद होताच 177 धावांवर बावुमाही बाद झाला. नंतर लगेचच शमीने रबाडालाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मार्को आणि महाराज यांनी आठव्या गड्यासाठी काही धावा केल्या पण महाराजला बुमराहने (Jasprit Bumrah) बाद करताच शार्दूलने अखेरचे दोन गडी बाद करत आफ्रिकेला 229 धावांत सर्वबाद केलं. त्यानंतर भारताने दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली. भारताचे बहुतांश फलंदाज फेल झाले. मात्र अनुभवी अजिंक्य रहाणेने 58 आणि चेतेश्वर पुजाराने 53 धावा केल्या. तसंच अखेरपर्यंत क्रिजवर राहून हनुमा विहारीने महत्त्वपूर्ण अशा नाबाजद 40 धावा केल्यामुळे भारताचा डाव 200 पार गेला. ज्यामुळे विजय मिळवण्यासाठी आफ्रिकेला 240 धावांची गरज आहे.