भारत : आशिया चषकात (Asia Cup) दोन सप्टेंबर रोजी भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) ही लढत होणार आहे. पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात दुखापत झाल्याने भारताचा यष्टीरक्षक केएल राहुल (KL Rahul) हा खेळू शकणार नाही. त्यामुळे राखीव यष्टीरक्षक म्हणून आता ईशान किशन (Ishan Kishan) हा सामना खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे. मात्र, ईशान किशन नेमकं कोणत्या स्थानावर खेळणार हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ईशान किशन हा फलंदाजीची मधली फळी सांभाळणार असल्याचं म्हटलं जातं आहे. 


वरच्या फळीत कोणताही बदल नाही


ईशान किशनने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये दमदार खेळी केली. यावेळी त्याने तिन्ही सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने आशिया चषकातले त्याचे स्थान निश्चित केले. पण त्याने जरी उत्कृष्ट कामगिरी केली असली तरीही वरच्या फळीमध्ये संघाच्या व्यवस्थापनाने कोणताही बदल केलेला नाही. 


शुभमन गिल आणि रोहित शर्मा भारताची सलामीवीराची धुरा सांभाळणार आहेत. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. ईशान किशनला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाईल. पाकिस्तानशिवाय नेपाळविरुद्धच्या सामन्यात देखील ईशानचा प्लेईंग 11 मध्ये समावेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


ईशान किशनचा विश्वचषकामध्येही समावेश


माहितीनुसार, केएल राहुल पहिले दोन सामने खेळणार नाही. त्यासाठी राखीव म्हणून ठेवण्यात आलेला संजू सॅमसन हा देखील संघामध्ये सामील होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर केएल राहुल आशिया चषकातून पूर्णपणे बाहेर पडला तर संजू सॅमसनला संघामध्ये संधी दिली जाऊ शकते.


दरम्यान ईशान किशन हा विश्वचषकाचा देखील भाग होणार असल्याचं चित्र देखील आता स्पष्ट झालं आहे. विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या 15 जणांच्या संघामध्ये ईशान किशनला देखील स्थान देण्यात आलं आहे. गरज पडल्यास ईशान राखीव सलामीवीर म्हणून धुरा सांभाळेल. तसेच विश्वचषकासाठी भारतीय संघाची 4 किंवा 5 सप्टेंबर रोजी घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. तर दुपारी 2.30 वाजता नाणेफेक होणार आहे. हा सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. श्रीलंकेच्या पल्लेकल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण यांचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर संजू सॅमसन हा राखीव खेळाडू आहे. 


हेही वाचा : 


Asia Cup 2023 : टीम इंडियाचे हे चार शिलेदार पाकिस्तानविरोधात पहिल्यांदाच मैदानात उतरणार, दिग्गजांचा समावेश