मुंबई : भारत आणि न्यूझीलंड संघांत पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन्सची आज घोषणा केली आहे. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा 'टाय' झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल. ही कसोटी 18 ते 22 जून या कालावधीत इंग्लंडमधल्या साऊदम्प्टन खेळवण्यात येणार आहे. 


राखीव दिवसाचीही घोषणा
आयसीसीने या कसोटीसाठी राखीव दिवसाचाही घोषणा केली आहे. या सामन्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसांत कोणत्याही कारणांनी खेळ वाया गेल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल. त्याबाबतचा निर्णय सामनाधिकारी आणि पंच मिळून 22 जूनला अखेरच्या तासात घेतील.


2019 मध्ये कसोटी विजेतेपदाला सुरुवात
आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपदाची सुरुवात ऑगस्ट 2019 मध्ये झाली होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे चॅम्पियनशिपचे बहुतांश सामने खेळवण्यात आले नाहीत. एवढंच नाही तर मागील वर्षी  आयसीसीने कसोटी विजेतेपदाच्या नियमांमध्ये बदलही केले होते.


या स्पर्धेत भारताची कामगिरी उत्तम होती. भारताने 520 अंकांसह चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. तर न्यूझीलंडचा संघ 420 अंकांसह दुसऱ्या स्थानावर राहिल्याने त्याने अंतिम फेरीत धडक मारली.


भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार
न्यूझीलंडचा संघ अंतिम सामन्यासाठी आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. परंतु भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे संघातील सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये दहा दिवस क्वॉरन्टीन व्हावं लागेल. मात्र क्वॉरन्टीन काळात खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.