India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडला तिसऱ्याच षटकांत पहिला धक्का बसला. चांगल्या फॉर्मात असलेला डेव्हॉन कॉनवे स्वस्तात बाद झाला. वेगवान गोलंदाज आकाश दीपने कॉनवेला पायचीत बाद केले. सध्या न्यूझीलंडने एक विकेट गमावत 13 षटकांत 51 धावा केल्या आहेत.
पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात कॉनवेने महत्वाच्या 91 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 17 धावा केल्या होत्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 76 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात 17 धावा केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात कॉनवेला लवकर बाद करणे महत्वाचे होते आणि आकाश दीपने तेचे केले. वानखेडेवरील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात कॉनवेला फक्त 4 धावा करता आल्या. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला भिडणाऱ्या कॉनवेला आकाश दीप नडला, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करण्यात येत आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन:
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल/सरफराज खान, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन:
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हॅन्री, एजाज पटेल, विल्यम ओरुके.
भारताला 6 सामन्यात 4 विजय आवश्यक-
आता पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर होणारा तिसरा आणि अंतिम कसोटी सामना भारताला कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत अजूनही सहा कसोटी सामने खेळायचे आहेत आणि अंतिम फेरीत पोहचण्यासाठी किमान चार सामने जिंकावे लागतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारत पुणे कसोटीपूर्वी 68.06 टक्के गुणांसह WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ 61.50 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय 55.56 टक्के गुणांसह श्रीलंका तिसऱ्या, दक्षिण आफ्रिका 47.62 टक्के गुणांसह चौथ्या क्रमांकावर आणि न्यूझीलंड 44.44 टक्के गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताची गुणांची टक्केवारी 62.82 वर आली आहे.