India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कसोटी मालिकेमधील आज तिसरा सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. कर्णधार टॉम लॅथमने फिरकीपटू इश सोढीला संघात सामील केले आहे. तर टीम साऊदीच्या जागी मॅट हॅन्रीला संधी देण्यात आली आहे. भारताने देखील संघात एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान दिले आहे.  


तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन:


भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल/सरफराज खान, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज


न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हॅन्री, एजाज पटेल, विल्यम ओरुके.


वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?


पुणे कसोटीत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व होते, पण पहिल्या दिवशी वानखेडेची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. दुसऱ्या दिवशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. वेगवान गोलंदाज नवीन चेंडूने भेदक मारा करू शकतात. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरने पुणे कसोटीत एकूण 11 विकेट्स घेतल्या होत्या. 


भारताला 6 सामन्यात 4 विजय आवश्यक-


आता पुढील वर्षी जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या शर्यतीत राहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर होणारा तिसरा आणि अंतिम कसोटी सामना भारताला कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत अजूनही सहा कसोटी सामने खेळायचे आहेत आणि अंतिम फेरीत पोहचण्यासाठी किमान चार सामने जिंकावे लागतील.


वानखेडेवर भारत आणि न्यूझीलंड किती वेळा भिडले?


वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत. यासह न्यूझीलंड संघाने 1 सामना जिंकला आहे. एवढेच नाही तर भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये 38 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 17 कसोटी जिंकल्या आहेत. तर न्यूझीलंडने केवळ 4 सामने जिंकले आहेत. तसेच 17 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.


संबंधित बातमी:


Ind vs NZ: भारत अन् न्यूझीलंडमध्ये आज रंगणार तिसरा कसोटी सामना; वानखेडेची खेळपट्टी कशी असेल?, पाहा A टू Z माहिती