राजकोट : कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रवींद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) धडाकेबाज शतकं आणि पदार्पणवीर सरफराज खानच्या (Sarfaraj Khan) खणखणीत अर्धशतकाने, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताने गाजवला. 3 बाद 33 अशी दयनीय अवस्था असताना, पहिल्या दिवसअखेर भारताने 5 बाद 326 धावांपर्यंत मजल मारली. दिवसअखेर रवींद्र जाडेजा 110 आणि कुलदीप यादव 1 धावावर मैदानात आहेत.  अर्धशतकवीर सरफराज खान धावबाद झाल्याने पहिल्या दिवसाचा शेवट  निराशाजनक झाला. कारण पदार्पणाच्या कसोटीत सरफराजने जबरदस्त खेळी करत 62 धावांचं योगदान दिलं.   


राजकोटच्या तिसऱ्या कसोटीत कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि नवख्या रजत पाटीदारने सपशेल निराशा केली. जयस्वाल अवघ्या 10 धावांवर, गिल शून्यावर आणि पाटीदार अवघ्या 5 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया पुरती अडचणीत सापडली. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाने आधी डाव सावरला आणि मग डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी रचली.


रोहित शर्माचं धडाकेबाज शतक (Rohit Sharma century) 


भारताचा कर्णधार रोहित शर्माने दमदार शतक ठोकलं. भारताची  अवस्था 3 बाद 33 अशी बिकट झाली असताना, रोहित शर्माने शतक ठोकून, डावाला आकार दिला. रोहित शर्माने  157 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह शतक झळकावलं. रोहितचं कसोटीमधील हे 11 वे शतक आहे. शतक झाल्यानंतर रोहित शर्माने गिअर बदलून, धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्क वूडने त्याला स्टोक्सकरवी झेलबाद केलं. रोहित शर्माने 196 चेंडूत 131 धावा ठोकल्या. यामध्ये त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले.   


पदार्पणात अर्धशतक (Sarfaraj Khan fifty)


दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतून पदार्पण करणाऱ्या सरफराज खानने (Sarfaraj Khan) अर्धशतकी सलामी दिली. एकीकडे कर्णधार रोहित शर्मा धडाकेबाज शतक ठोकून परतल्यानंतर, रवींद्र जाडेजाच्या साथीला आलेला सरफारज खानने वन डे स्टाईल अर्धशतक झळकावलं. तर दुसरीकडे सर रवींद्र जाडेजानेही घरच्या मैदानात अर्धशतकी वाटचाल केली. सरफराजने अवघ्या 48 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकार लगावले. 


सरफराजच्या वन डे स्टाईल अर्धशतकाने प्रेक्षक गॅलरीत बसलेले वडील आणि पत्नीचा उर अभिमानाने भरून आला. सरफराज खानच्या पदार्पणाने बापाच्या डोळ्याच्या कडा आनंदाने ओल्या झालेलं संपूर्ण देशाने आजच सकाळी पाहिलं होतं. त्याच बापाच्या अश्रूचं सोनं सरफराजने अर्धशतकाने केलं.  


जाडेजाच्या शतकाच्या नादात सरफराज धावबाद (Sarfaraj Khan out)


दरम्यान, रवींद्र जाडेजा 99 धावांवर असताना, एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जाडेजाचा कॉल फसला, त्यामुळे तुफान फॉर्ममध्ये खेळत असलेला सरफराज धावबाद झाला. सरफराजने 62 धावा केल्या. 


रवींद्र जाडेजाचं शतक (Ravindra Jadaje hundred)


तिकडे रोहित शर्मासोबत टिच्चून फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जाडेजाने घरच्या मैदानात झुंजार शतकी खेळी केली. रोहितच्या साथीने भारताचा डाव सावरुन, जाडेजाने कारकिर्दीतील चौथं कसोटी शतक झळकावलं. जाडेजाने 198 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार लगावले.  


संबंधित बातम्या 


बापाच्या अश्रूचं सोनं केलं, सरफराजने करुन दाखवलं, पहिल्याच सामन्यात खणखणीत अर्धशतक

Rohit Sharma century : रोहित शर्माचं धडाकेबाज शतक, 3 बाद 33 धावांवरुन डाव सावरला