मुंबई : भारत आणि इंग्लंड संघांमधल्या एकदिवसीय सामन्यांच्या पुण्यातल्या आयोजनाविषयीची अनिश्चितता अखेर दूर झाली आहे. भारत आणि इंग्लंड संघांत पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर 23, 25 आणि 28 मार्च रोजी तीन वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या तीनही सामन्यांचं आयोजन स्थळ बदललं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु असं काही घडलं नाही.


कोरोनाविषयक नियमांचं पालन करुन आणि प्रेक्षकांविना या सामन्यांचं पुण्यात आयोजन करण्यासाठी राज्य सरकारकडून परवानगी देण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरल्याचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी नमूद केलं आहे.



कोरोनाचा महाराष्ट्रातला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सर्व सूचनांचं पालन करण्याचं आश्वासन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत देण्यात आलं. उभय संघांमधील खेळाडू, तीन वन डे सामन्यांवरचे पंच आणि संयोजन समितीतील पदाधिकारी यांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं.


दरम्यान एकदिवसीय मालिकेआधी दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेचं आयोजन अहमदाबादमध्ये होणार आहे. पहिला टी20 सामना 12 मार्चला होईल, दुसरा सामना 14 मार्च, तिसरा सामना 16 मार्च, चौथा सामना -18 मार्च आणि अखेरचा सामना 20 मार्च रोजी खेळवला जाईल.