IND Vs ENG: इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकिट मिळवण्यासाठी चौथा सामना जिंकण किंवा अनिर्णित ठेवणं भारतीय संघाला आवश्यक आहे. या महत्वाच्या सामन्यात संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र संघात नसणार आहे.


चौथ्या कसोटीआधी टीम इंडियाला बुमराह खेळणार नसल्यानं मोठा धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहनं खाजगी कारणांमुळं शेवटच्या कसोटीत खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळं त्याला संघातून रिलिज करण्यात आलं आहे. त्याच्या संघाबाहेर जाण्याविषयी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र एएनआयच्या रिपोर्टनुसार बुमराहनं खाजगी कारणामुळं शेवटच्या कसोटीत न खेळण्याबाबत विनंती केली होती, जी मंजूर करण्यात आली आहे.


ICC World Test Championship: भारत पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी, फायनलमध्ये पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?


तिसऱ्या कसोटीत शानदार विजयासह टीम इंडियाची आघाडी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा कसोटी सामना दुसर्‍याच दिवशी संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहास दोन दिवसांत सामन्याचा निकाल येण्याची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही 22वी वेळ आहे. विशेष म्हणजे, यामध्ये इंग्लंडचा 13 वेळा सहभाग होता. या 13 सामन्यात इंग्लंडचा चार वेळा पराभव झाला आहे.


या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 112 धावा केल्या. यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात 145 धावा करू शकला. अशाप्रकारे पहिल्या डावात भारताने 33 धावांची आघाडी मिळवली होती. यानंतर इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात 81 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताला 49 धावांचे लक्ष्य मिळाले, जे भारतीय संघाने कोणत्याही विकेट न गमावता 7.4 षटकांत पूर्ण केले.


अक्षर पटेल भारतीय संघाच्या विजयाचा हीरो
भारताच्या या शानदार विजयाचा अक्षर पटेल नायक ठरला. आपला दुसरी कसोटी सामना खेळताना अक्षर पटेलने या कसोटीच्या दोन्ही डावात पाच विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने 38 धावा देऊन सहा विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात त्याने 32 धावा देऊन पाच बळी घेतले. यासह, तो दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे.