IND vs ENG 4th T20: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी -20 सामन्यात भारताने इंग्लंडचा आठ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. भारताने 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 185 धावांचं लक्ष्य उभारलं होतं. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडला निर्धारित 20 षटकांत आठ बाद 177 धावांवरपर्यंतचं मजल मारता आली.
इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 23 चेंडूंत चार चौकार व तीन षटकारांच्या मदतीने 46 धावा फटकावल्या. त्याच्या व्यतिरिक्त जेसन रॉयने 40, जॉनी बेअरस्टोने 25 आणि डेव्हिड मलानने 14 धावांचे योगदान दिले. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि राहुल चहर व हार्दिक पंड्याने प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली.
सूर्यकुमार यादवची जोरदार फिफ्टी
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला पहिला झटका 21 धावांवर रोहित शर्माच्या (12 ) रूपात मिळाला. यानंतर लोकेश राहुल (14) आणि सूर्यकुमार यांनी दुसर्या विकेटसाठी 27 चेंडूत 42 धावांची भागीदारी केली. रोहितला जोफ्रा आर्चरने बाद केले तर बेन स्टोक्सने राहुलला बाद केले.
पदार्पणाच्या डावात सूर्यकुमारने 31 चेंडूत 6 चौकार आणि तीन षटकार लगावले. टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. पंतने 23 चेंडूत 4 चौकार ठोकले. शेवटी अय्यरने 18 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह एक शानदार डाव खेळला आणि भारताला आठ विकेटवर 185 धावांपर्यंत मजल मारुन दिली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबर झाली आहे. मालिकेचा निर्णायक सामना 20 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.