India vs England 3rd Test Day 4: राजकोट कसोटीत भारताचा विजय जवळपास निश्चित झालाय. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघानं दुसरा डाव 4 बाद 430 धावांवर घोषीत केलाय. इंग्लंडला विजयासाठी भारताने तब्बल 557 धावांचे विराट आव्हान दिलेय. पहिल्या डावात भारताकडे 126 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जायस्वाल यानं द्विशतकी खेळी केली. तर सरफराज खान आणि शुभमन गिल यांनी तडाखेबाद अर्धशतकं ठोकली. युवा यशस्वी जायस्वाल यानं अनुभवी जेम्स अँडरसनची पिसे काढली.
यशस्वी जायस्वालचं सलग दुसरं द्विशतक -
अवघी सातवी कसोटी खेळणाऱ्या 21 वर्षीय यशस्वी जायस्वाल यानं सलग दुसरं द्विशतक ठोकलं. यशस्वी जायस्वाल यानं पहिल्या चेंडूपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मार्क वूड आणि जेम्स अँडरसन यासारखे अनुभव गोलंदाजही यशस्वी जायस्वालसमोर फिके पडले. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जायस्वाल यानं शानदार शतक ठोकल. पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. पण चौथ्या दिवशी पुन्हा तो मैदानावर परतला. जिथे खेळ सोडला तेथूनच त्यानं सुरुवात केली. त्यानं गोलंदाज कोण आहे ? याचा विचार केला नाही फक्त चेंडू फटकावलं. यशस्वी जायस्वाल यानं 236 चेंडूत 214 धावांची खेळी करत माघारी परतला. यशस्वीनं आपल्या या खेळीमध्ये 12 षटकार आणि 14 चौकार ठोकले. एकाच डावात सर्वाधिक षटकार लगावण्याचाही विक्रम यशस्वीच्या नावावर झाला आहे.
शुभमन गिलची शानदार खेळी -
तिसऱ्या दिवशी भारत दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला. पण कर्णधार रोहित शर्मा 19 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिल यानं संयमी फलंदाजी केली. शुभमन गिल यानं यशस्वी जायस्वाल याला चांगली साथ दिली. शुभमन गिल यानं 91 धावांची खेळी केली. तो शतक करेल असे वाटलं होतं, पण दुर्दैवीरित्या धावबाद झाला. शुभमन गिल यानं 151 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 91 धावा जोडल्या.
सरफराजचीही धमाकेदार फलंदाजी -
सरफराज खान यानेही मिळालेल्या संधीचं सोनं केले. सरफराज खान यानं राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावातही अर्धशतक ठोकलं. सरफराज खान यानं वनडे स्टाईल फटकेबाजी केली. सरफराज खान यानं 72 चेंडूमध्ये 68 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 6 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे. सरफराज खान याने चौफेर फटकेबाजी करत यशस्वी जायस्वाल याला साध दिली.
पहिल्या डावात भारताकडे 126 धावांची आघाडी -
भारताने पहिल्या डावात 445 धावांपर्यंत मजल मारली होती. रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकाच्या बळावर भारताने 445 धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा बचाव करताना भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 319 धावांत गुंडाळलं. मोहम्मद सिराज यानं चार फलंदाजांना तंबूत धाडलं. पहिल्या डावात भारताने 126 धावांची आघाडी घेतली.