IND vs ENG : चेन्नई कसोटीत इंग्लंडकडून मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर मालिकेत पुनरागमन करण्यासाठी बराच दबाव आहे. दुसर्या कसोटी सामन्यात विजयासह कमबॅकच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी कसोटी सामन्यादरम्यान जाडेजाला ही दुखापत झाली होती.
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो संघाचा भाग नव्हता. जडेजा मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामन्यासाठी फिट होईल अशी अपेक्षा होती. पण अद्याप त्याची दुखापत पूर्णपणे बरी होऊ शकली नाही आणि त्यामुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने रवींद्र जडेजाला मिस केले. त्याच्या जागी संघात समाविष्ट केलेला शाहबाज नदीम दमदार कामगिरी करु शकला नाही. पहिल्या कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरनेही गोलंदाजीत निराश केले. त्यामुळे आपोआप अश्विनवरचा दबाव वाढला.
...तर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, इंग्लंडच्या माँटी पनेसरचा सल्ला
कसोटी कारकीर्दीत 51 सामन्यात 220 विकेट घेणारा जाडेजाने भारतात 157 विकेट घेतल्या आहेत. जाडेजाने आतापर्यंत कसोटीत नऊ वेळा पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. यापैकी भारतात सात वेळा ही कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांवर जाडेजा यशस्वी ठरतो. त्याच्या वेगवान आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या क्षमतेमुळे तो भारताच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी आणखी घातक ठरतो.
विराट कोहलीला मिळणार खास व्यक्तीची साथ, संघाच्या कामगिरीकडे साऱ्यांचं लक्ष
अक्षर पटेलला मिळू शकते संधी
दुसर्या कसोटीत नदीमच्या जागी अक्षरचा संघात समावेश होऊ शकतो. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अक्षरला गुडघ्याला दुखापत झाली होती. आता तो तंदुरुस्त झाला आहे आणि त्याने नेटवरही सराव करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातही तो खेळणार होता, पण दुखापतीमुळे खेळू शकला नाही. दुसर्या कसोटीपूर्वी अक्षरच्या तंदुरुस्तीच्या आधारे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण हे त्याला खेळवायचं की नाही याबाबत निर्णय घेतील.