India vs England 2021 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या टीम इंडियाविषयी ताजी अपडेट जारी केली आहे. यात खेळाडूंच्या सद्यस्थितीचा उल्लेख आहे. त्यानुसार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला असून तो दौऱ्यातून बाहेर गेला आहे. लवकरच सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये टीम इंडियामध्ये सामील होतील.


बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या उजव्या हाताच्या बॉलिंग फिंगरमध्ये इंजेक्शन घेतले होते. मात्र तो या दुखापतीतून बाहेर येण्यास आणखी काही वेळ जाईल. त्यामुळे तो गोलंदाजीसाठी फिट नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. 


सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज आवेश खानच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याला एक्स-रेसाठी नेले असता त्याला फ्रॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आवेश खान देखील इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशि स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलामीवीर शुभमन गिल देखील दुखापतग्रस्त झाला होता. एमआरआय स्कॅनद्वारे त्याची पुष्टी झाली होती. तो देखील इंग्लंड दौर्‍याबाहेर असून तो भारतात परतला आहे.


ऋषभ पंतची कोरोनावर मात


विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत देखील कोरोनातून बरा झाला आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याने आगामी कसोटी मालिकेसाठी आपली तयारी सुरू केली आहे. याशिवाय बॉलिंग कोच बी अरुण, वृध्दिमान साहा आणि अभिमन्यु इश्वरन यांनी आपलं सेल्फ आयसोलेशन काळ पूर्ण केला आहे आणि आता डरहॅममध्ये टीम इंडियासोबत जोडले गेले आहेत.


निवड समितीने पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना बदली म्हणून नाव दिले आहे. हे दोघेही लवकरच इंग्लंडला रवाना होतील. सध्या श्रीलंकेत शिखर धवनच्या नेतृत्वात सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे टीम इंडियाचा भाग आहेत.


इंग्लंड दौर्‍यासाठी सुधारित भारतीय संघ


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृध्दिमान साहा (विकेटकीपर), अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव.