INDIA vs ENGLAND 1st ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आज खेळला जाणार आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर दुपारी दीड वाजल्यापासून हा सामना सुरू होईल. कसोटी आणि टी -20 मालिकेत विराट सेनेने चांगली कामगिरी केली. पण एकदिवसीय सामन्यांमध्ये इंग्लंडचा संघ मोठे आव्हान असणार आहे. सध्या दोन्ही संघांची सध्याची कामगिरी पाहता एकदिवसीय मालिका अटीतटीच होईल, हे चुकीचे ठरणार नाही.


रोहित आणि धवन ओपनिंग करणार


रोहित शर्मा आणि शिखर धवन पहिल्या एकदिवसीय सामन्यात ओपनिंग करणार आहेत, असं भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर तिसर्‍या क्रमांकावर विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळणार आहे. मात्र विकेटकीपिंगची जबाबदारी विराट कुणावर सोपवणार हे पाहावं लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ही भूमिका केएल राहुलने पार पाडली होती. परंतु इंग्लंडविरुद्ध ऋषभ पंतचा सध्याचा फॉर्म पाहता त्याचं संघात पुनरागमन होईल अशी अपेक्षा आहे.


क्रुणाल पांड्याला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता


भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा वनडे मालिकेतही टीम इंडियाचा भाग नाही. कसोटी आणि टी -20 मालिकेत अक्षर पटेलची जाडेजाची कमतरता पूर्ण केली होती. पण वनडे मालिकेत त्याचा संघात समावेश झालेला नाही. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्रुणाल पांड्याला संधी देऊ शकतो. 


भारताकडून 18 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्‍या क्रुणालला सध्याचा फॉर्म पाहता एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कृणालने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली होती. याशिवाय गोलंदाजीतही त्याची कामगिरी चांगली होती. अशा परिस्थितीत आज पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याचं पदार्पण होणे जवळपास निश्चित आहे.


तीन वेगवान गोलंदाजांना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडिया तीन वेगवान गोलंदाजांसह उतरू शकते. भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर खेळण्याची खात्री आहे, पण तिसरा गोलंदाज कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. टी. नटराजन, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या रूपात तीन पर्याय आहेत. एकूण सहा गोलंदाजींच्या पर्यायांसह भारत या सामन्यात मैदानात उतरेल. 


संभाव्या भारतीय संघ


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार.