India vs England 1st ODI: विराट कोहलीच्या टीम इंडियानं पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपाठोपाठ ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिकाही जिंकण्याचा पराक्रम गाजवला. आता उभय संघांमधल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला आजपासून पुण्यातल्या गहुंजेच्या एमसीए स्टेडियवर सुरुवात होत आहे. दुपारी दीड वाजता होणार सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना आज, तर उर्वरित दोन सामने 26 आणि 28 मार्च रोजी खेळवण्यात येतील. ही मालिका जिंकून इंग्लंडविरुद्ध विजयाची हॅटट्रिक साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहिल. 


भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनच्या भावी कारकीर्दीच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. धवनची ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेतली कामगिरी निराशाजनक ठरली. त्यामुळं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकासाठी संघ निवडीच्या शर्यतीत राहण्यासाठी धवनच्या दृष्टीनं वन डे सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरेल. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर धवनने फक्त 9 वनडे मॅच खेळले आहेत. या ९ सामन्यात दोन मॅचमध्ये फलंदाजी केली नाही. त्यापैकी ७ मॅचमध्ये धवनने अनुक्रमे 2, 36, 74, 96, 74, 30, 16 धावा केल्या. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन सुरुवात करतील. 


एकदिवसीय मालिकेत प्रेक्षकांची उपस्थिती नसणार


महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे वनडे मालिका रिकाम्या स्टेडियममध्येच खेळली जाईल. महाराष्ट्रात पुन्हा कोरोना संक्रमण वाढल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय मालिकेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळले जातील. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने दुपारी दीड वाजता सुरू होतील.


भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.


एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक


पहिला वनडे - 23 मार्च (पुणे)


दुसरा वनडे - 26 मार्च (पुणे)


तिसरा वनडे - 28 मार्च (पुणे)