मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये येत्या 27 नोव्हेंबरपासून एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही देशांमधी तीन एकदिवसीय सामने आणि त्यानंतर तीन ट्वेण्टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. परंतु ऑस्ट्रेलियन संघाला या मालिकेआझी मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज केन रिचर्डसनने या मालिकांमधून माघार घेतली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या संघात केन रिचर्डसनची जागा अँड्र्यू टाय घेणार आहे.


रिचर्डसनने मंगळवारी (17 नोव्हेंबर) मर्यादित षटकांच्या मालिकेतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. ऑस्टेलियन संघाच्या निवड समितीच्या प्रमुखांना सांगितलं की, "केन रिचर्डसनसाठी हा कठीण निर्णय आहे. परंतु बोर्ड आणि निवड समिती सगळ्या खेळाडूंच्या सोबत आहे."


केन रिचर्डसन नुकताच बाबा बनला आहे आणि त्याला बाळासोबत काही वेळ व्यतीत करायचा आहे. निवड समितीचे प्रमुख म्हणाले की, "केनला आफल्या बाळासोबत काही वेळ घालवायचा आहे. आम्ही आमच्या खेळाडूंच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कायमच पाठिशी आहोत. हा कठीण काळ आहे, पण आम्ही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो.





ठरलेल्या वेळापत्रकानुसार मालिका खेळवली जाणार : क्रिकेट ऑस्ट्रेलिया
दरम्यान ऑस्ट्रेलियात पुन्हा कोरोनाची लाट आल्याने कोविड-19 रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.


आयपीएलचा तेरावा मोसम संपल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पहिला सामना 17 ते 21 डिसेंबर दरम्यान अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे.


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचं वेळापत्रक


एकदिवसीय मालिका
पहिला सामना- 27 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
दुसरा सामना 29 नोव्हेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)
तिसरा सामना- 2 डिसेंबर (सकाळी 8 वाजता सुरु)


ट्वेण्टी-20 मालिका
पहिला सामना - 4 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
दुसरा सामना - 6 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)
तिसरा सामना - 8 डिसेंबर (दुपारी 12.30 वाजता सुरु)


कसोटी मालिका
पहिला सामना - 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर (डे-नाईट सामना, सकाळी 8.30 वाजता सुरु)
दुसरा सामना - 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर (पहाटे 4.30 वाजता सुरु)
तिसरा सामना - 7 जानेवारी ते 11 जानेवारी (पहाटे 4.30 वाजता सुरु)
चौथा सामना - 15 जानेवारी ते 19 जानेवारी (पहाटे 5 वाजता सुरु)