अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाची दाणादाण उडाली. अॅडलेडमध्ये टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे. भारताचा डाव अवघ्या 36 धावांवर आटोपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाची ही नीचांकी धावसंख्या आहे. आता या सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर अवघ्या 90 धावांचं माफक आव्हान आहे.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशा केली. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीच्या मनगटाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ट हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. परिणामी भारताचा डाव अवघ्या 36 धावात संपुष्टात आला.
भारतीय संघाच्या कोणत्याही फलंदाजाला धावसंख्येचा दुहेरी आकडा गाठता आला नाही. मयांक अग्रवालने सर्वाधिक 9 धावा केल्या. तर हनुमा विहारीला 8 धावा करण्यात यश आलं. चेतेश्वर पुजारा, अजिंक रहाणे आणि आर अश्विनला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोस हेजलवूडने अवघ्या 8 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या तर पॅट कमिन्सला 21 धावा देऊन चार विकेट्स मिळवता आल्या.
भारतीय फलंदाजांनी फारच खराब कामगिरी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतीय संघाकडे 62 धावांची आघाडी होती. परंतु भारताने स्वप्नातही विचार केला नसेल की, तिसऱ्या दिवशी संघाची अवस्था एवढी वाईट होईल. भारताला दुसऱ्या डावात 100 धावांची आघाडीही घेता आली नाही.
भारताची कसोटीत खराब कामगिरी
3️6 धावा वि. ऑस्ट्रेलिया, अॅडलेड, 2020*
4️2️ धावा वि. इंग्लंड, लॉर्ड्स, 1974
5️8 धावा वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, 1947
6️6 धावा वि. दक्षिण आफ्रिका, डर्बन, 1996
6️7 धावा वि. ऑस्ट्रेलिया, मेलबर्न, 1948
IND vs AUS, Adelaide Test | अॅडलेडमध्ये भारताचा लाजिरवाणा विक्रम, अवघ्या 36 धावांवर संघ गारद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Dec 2020 11:31 AM (IST)
IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर आटोपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील भारतीय संघाची ही नीचांकी धावसंख्या आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -