India vs Australia Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात कसोटी मालिका उद्यापासून (9 फेब्रुवारी) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) भारताचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. भारताने अनेक वेळा ऑस्ट्रेलियाला कसोटी फॉरमॅटमध्ये पराभूत केलं आहे. मात्र यातील पाच सामन्यातील विजय अतिशय संस्मरणीय ठरले आहेत. त्यात कोलकाता 2001 ते ब्रिस्बेन 2021 पर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांचा समावेश आहे. याच सामन्यांबद्दल जाणून घेऊ...


कोलकाता कसोटी, 2001


स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ त्याकाळी खूप दमदार होता. त्यांच्याकडे ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्नसारखे धोकादायक गोलंदाज होते, जे कोणत्याही विरोधी संघाला घाम फोडण्यासाठी पुरेसे होते. पण सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघही काही कमी नव्हता. 2001 साली ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता.यादरम्यान पहिली कसोटी 10 विकेट्सने कांगारुंनी जिंकली होती. ज्यानंतर दुसरी कसोटी कोलकात्यात खेळली गेली. यामध्ये भारताने शानदार पुनरागमन करत 171 धावांनी सामना जिंकला. भारताकडून दुसऱ्या डावात व्हीव्हीएस लक्ष्मणने 281 धावा केल्या.


अॅडलेड टेस्ट, 2003


टीम इंडिया 2003 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. यादरम्यान दोघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. यानंतर दुसऱ्या कसोटीत भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 556 धावा आणि दुसऱ्या डावात 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 523 धावा आणि दुसऱ्या डावात 233 धावा करत सामना जिंकला. भारताकडून राहुल द्रविडने दुसऱ्या डावात 233 धावा केल्या. तर लक्ष्मणने 148 धावांची खेळी खेळली होती.


बंगळूरु कसोटी, 2017


ऑस्ट्रेलियन संघ 2017 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. यादरम्यान बंगळूरूमध्ये दुसरी कसोटी खेळली गेली. भारतीय संघ पहिल्या डावात 189 धावांवर सर्वबाद झाला होता. केएल राहुलने पहिल्या डावात 90 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 276 धावा केल्या होत्या. पुजाराच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 274 धावा केल्या. मात्र यानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात स्थिती बिघडवली. त्याने 6 बळी घेतले आणि ऑस्ट्रेलियन संघ 112 धावांवर सर्वबाद झाला.


मेलबर्न कसोटी, 2020-21


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डिसेंबर 2020 मध्ये मेलबर्न येथे एक कसोटी सामना खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्याच्या पहिल्या डावात 195 धावा तर दुसऱ्या डावात 200 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 326 धावा आणि दुसऱ्या डावात 70 धावा करत सामना जिंकला. टीम इंडियासाठी पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने शतक झळकावलं. त्याने 233 चेंडूत 112 धावा केल्या. भारताच्या विजयात त्याचा वाटा महत्त्वाचा होता.


गाबाचा विजय, ब्रिस्बेन टेस्ट, 2021


गाबामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 294 धावा झाल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 336 आणि दुसऱ्या डावात 329 धावा करत सामना जिंकला. टीम इंडियाचा खेळाडू ऋषभ पंत सामनावीर ठरला. दुसऱ्या डावात त्याने नाबाद 89 धावा केल्या.


हे देखील वाचा-