India vs Australia Ahmedabad Test: टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 नं पुढे आहे. अशा परिस्थितीत हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. विशेषत: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीनं हा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. अहमदाबाद कसोटीत टीम इंडिया हरली किंवा सामना अनिर्णित राहिला, तरच श्रीलंकेचा पराभव किंवा न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राहणं टीम इंडियाला पुढे नेऊ शकेल.










सोशल मीडियावर दोन खेळपट्ट्यांचे फोटो व्हायरल 


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदूरमध्ये खेळवण्यात आला होता. हा सामना केवळ अडीच दिवसांतच संपला. त्यानंतर इंदूरमधील लाल मातीच्या खेळपट्टीवर जोरदार टीका झाली होती. मात्र आता टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. सध्या समोर येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार, अहमदाबादच्या मैदानावर दोन खेळपट्ट्या असून सध्या त्या झाकून ठेवलेल्या आहेत. म्हणजेच, हा सामना कोणत्या खेळपट्टीवर होणार? याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.










सोशल मीडियावरही असाच काहीसा दावा केला जात आहे आणि दोन्ही खेळपट्ट्यांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. या फोटोंमध्ये अहमदाबादच्या एका खेळपट्टीवर गवत दिसतंय. तसेच, या खेळपट्टीवर सतत पाणी घातलं जात आहे आणि त्यावर रोलरही चालवला जात आहे.


2021 मधील कसोटी सामना दोन दिवसांतच संपला


दोन खेळपट्ट्यांपैकी एक खेळपट्टी हिरवीगार असल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. म्हणजेच, त्यावर भरपूर गवत आहे. याच खेळपट्टीवर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना खेळवला जाऊ शकतो, असं बोललं जात आहे. असं झाल्यास अहमदाबाद कसोटीची मदार वेगवान गोलंदाजांच्या खांद्यावर असल्याचं क्रीडा समिक्षकांकडून बोललं जात आहे. गवताची खेळपट्टी म्हणजेच, ग्रीन पीच वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त मानला जातो. पण भारतीय मैदानांवरील खेळपट्टी एका रात्रीत बदलू शकते, असं आपण अनेकदा पाहिलं आहेच. 


मालिकेतील चौथा कसोटी सामना कोणत्या खेळपट्टीवर खेळवला जाईल, हे सामन्यापूर्वीच कळेल. अशा परिस्थितीत खेळपट्टी कशी असेल? याचा अंदाज लावता येणार नाही. दरम्यान, 2021 मध्ये याच मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात दोन कसोटी सामने खेळले गेले होते. हे दोन्ही सामने दोन वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर खेळवले गेले. यापैकी एक कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांतच संपला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


India Vs Australia Indore Pitch: इंदूरच्या खेळपट्टीवरुन दावे-प्रतिदावे; MPCA नं BCCI वर फोडलं खापर, आता ICC मध्येही दाद मागणार