India vs Australia: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची (Virat Kohli) गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. जगातील कोणत्याही मैदानावर धावा करण्याची विराटकडं क्षमता आहे. भल्याभल्या गोलदाजांनी विराटसमोर गुडघे टेकले आहेत. परंतु, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाच्या (Adam Zampa) गोलंदाजीसमोर विराट कोहली संघर्ष करताना दिसतोय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अॅडम झम्पानं विराटला आतापर्यंत आठ वेळा माघारी धाडलंय. 


विराटची निराशाजनक कामगिरी
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात नागपूरच्या (Nagpur) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Vidarbha Cricket Association Stadium) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामना खेळण्यात आला. पावसानं व्यत्यय आणलेला हा सामना 8-8 षटकांचा खेळण्यात आला. दरम्यान, भारताच्या डावातील पाचव्या षटकात अॅडम झम्पाच्या पहिल्या चेंडूवर विराटनं चौकार मारला. परंतु, दुसऱ्या चेंडूत अॅडम झम्पानं विराटला क्लीन बोर्ड केलं. या सामन्यात विराटनं 5 चेंडूत 11 धावा केल्या. 


विराट झम्पाची जुनी मैत्री
विराट कोहली आणि अॅडम झम्पा हे जुने मित्र आहेत. अॅडम झम्पा आयपीएलमध्ये विराटची टीम आरसीबीकडून खेळायचा. अशा परिस्थितीत झम्पानं दिर्घकाळ कोहलीला नेटमध्ये गोलंदाजी केलीय. दोघेही एकमेकांच्या कमकुवतपणा आणि ताकद ओळखतात. परंतु अॅडम 2020 पासून आयपीएल खेळत नाही. 2022 च्या मेगा लिलावातही त्याला कोणत्याही संघानं विकत घेतलं नाही.


भारताचा सहा विकेट्सनं विजय
कर्णधार रोहित शर्माच्या 20 चेंडूत नाबाद 46 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं पावसानं व्यत्यय आणलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पावसामुळं हा सामना अवघ्या 8-8 षटकांचा खेळण्यात आला. मॅथ्यू वेडच्या 20 चेंडूत 43 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 5 बाद 90 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं सहा विकेट्स आणि चार चेंडू राखून हा सामना जिंकला. अखेरच्या षटकात 9 धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं पहिल्या दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा-