IND vs AUS 2nd Test, Delhi India innings Highlights: आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मोक्याच्या क्षणी अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी शतकी भागिदारी करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. अक्षर पटेल यांनी दमदार अर्धशतकी खेळी केली. तर आर अश्विन याने त्याला चांगली साथ दिली. अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांनी मोक्याच्या क्षणी 114 धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल भारताची सुरुवात चांगली झाली होती. पण त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट पडल्यामुळे डाव अडचणीत सापडला होता. 139 धावात 7 विकेट भारताने गमावल्या होत्या. त्यानंतर अश्विन आणि अक्षर यांनी शतकी भागिदारी केली. परिणामी भारताचा पहिला डाव 262 धावांवर आटोपला.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा रोहित शर्मा आणि राहुल यांनी संयमी सुरुवात केली. जोडी जमली असे वाटत असतानाच लॉयन याने राहुल याला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या पुजारालाही लॉयन याने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर लागोपाठ बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव कोसळला असे वाटत होते. पण त्यावेळीच विराट कोहलीनं जाडेजाच्या साथीनं डाव सावरला. जाडेजा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी भागिदारी झाली. पण त्याचवेळी जाडेजाला 26 धावांवर बाद केलं. त्यानंतर विराट कोहलीही 44 धावांवर बाद झाला.. विराट कोहलीची विकेट पडल्यानंतर केएस भरत यालाही फारसी कमाल करता आली नाही. भारताचा डाव लवकर संपणार असे वाटत होते. पण अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी डावाची सुत्रे हातात घेतली. त्यांनी 117 चेंडूत 114 धावांची भागिदारी केली. आठव्या विकेटसाठी झालेल्या भागिदारीत ही सर्वोत्तम भागिदारी असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अश्विन बाद झाल्यानंतर भारताचा डाव कोसळला.. अक्षर आणि शमीही लगेच तंबूत परतले. भारताचा पहिला डाव 262 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला फक्त एका धावेची आघाडी मिळाली.
ऑस्ट्रेलियाने दिल्ली कसोटीत तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरले. त्यांनी आपलं कामही चोख बजावले. नॅथन लॉयन याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. त्याशिवाय पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुन्हेमन आणि मर्फी यांना प्रत्येकी दोन दोन विकेट मिळाल्या. कर्णधार पॅट कमिन्सला एका विकेटवर समाधान मानावं लागले.
भारताकडून एकमेव अर्धशतकअक्षर पटेल यानं मोक्याच्या क्षणी 74 धावांची खेळी केली. भारताकडून हे एकमेव अर्धशतक होय. विराट कोहलीनं 44, अश्विन याने 37, जाडेजानं 26 आणि कर्णधार रोहित शर्माने 32 धावांची खेळी केली. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही.