Team India for Sri Lanka Tour : भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात तीन वनडे आणि तीन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. गौतम गंभीर मुख्य कोच झाल्यानंतर हा पहिलाच दौरा आहे. त्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आतापर्यंत याबाबत अनेक बातम्या समोर आलेल्या आहेत. सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात येणार, टी20 संघाचं कर्णधारपद सूर्या किंवा हार्दिक यापैकी एकाकडे जाणार.. या सारख्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळेच श्रीलंका दौरा महत्वाचा ठरत आहे. क्रिकबजच्या रिपोर्ट्समध्ये टीम इंडियाच्या स्क्वाडबाबत चार मोठ्या अपडेट समोर आलेल्या आहेत.


रोहित शर्मा वनडे मालिकेत खेळू शकतो - 


टी20 विश्वचषकानंतर रोहित शर्माने टी20 क्रिकेटला रामराम ठोकलाय. तो सध्या USA मध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा सुट्ट्या संपवून श्रीलंकाविरोधात वनडे मालिका खेळू शकतो. श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची निवड होण्यापूर्वीच रोहित शर्मा निवड समितीला उपलब्धतेची माहिती देऊ शकतो. रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध असेल तर कर्णधारपद त्याच्याकडेच असेल.  


 
श्रेयस अय्यर आणि केएल राहुलचं कमबॅक 


देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आले होते.  इंग्लंडविरोधात मायदेशात झालेल्या मालिकात त्याची कामगिरी निराशाजनक झाली होती. पण आयपीएल 2024 मध्ये त्यानं आपल्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन केले होते. श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांचे संबंधही चांगले आहेत. कोलकात्यासाठी दोघांनी एकत्र काम केलेय. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात श्रेयस अय्यरचे कमबॅक होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जातोय. 


केएल राहुलही मोठ्या कालावधीनंतर टीम इंडियात परतण्याची शक्यता आहे. जानेवारी 2024 मध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी मालिकेनंतर त्यानं कोणताही सामना खेळलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, आता श्रीलंकेविरोधात केएल राहुल संघात कमबॅक करु शकतो. 



विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला ब्रेक?


सर्व सिनिअर खेळाडू तिन्ही फॉर्मेटसाठी उपलब्ध राहायला हवेत, असे हेड कोच गौतम गंभीर यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. पण आता मिळालेल्या वृत्तानुसार, श्रीलंका दौऱ्यातून विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना ब्रेक दिला जाऊ शकतो. पण समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला दिल्या जाणाऱ्या ब्रेकमुळे गौतम गंभीर नाखूश आहे.  


... तर केएल राहुलकडे वनडे संघाची धुरा - 


रोहित शर्मा आपल्या सुट्ट्या संपवून श्रीलंकाविरोधात वनडे मालिका खेळू शकतो. तो आपल्या उपलब्धतेबाबत लवकरच बीसीसीआयला सांगणार असल्याचं वृत्त आहे. पण जर रोहित शर्माने वनडे मालिकेतून माघार घेतली, तर केएल राहुल याच्याकडे टीम इंडियाची धुरा दिली जाऊ शकते.