India win 5th Test against England at Dharamsala : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत टीम इंडियाने एक डाव आणि 64 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात आर अश्विनने इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्यामुळे कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी भारताने विजय मिळवला.  या कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाने 477 धावांचा डोंगर रचून, इंग्लंडवर 259 धावांची आघाडी घेतली होती. भारताची ही भली मोठी आघाडी इंग्लंडला झेपली नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात 195 धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने ही कसोटी एक डाव आणि 64 धावांनी खिशात टाकली.  






अश्विन, कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी


आर अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची भांबेरी उडाली. अश्विनने एकाही फलंदाजाला जास्तवेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत परतले. भारताने पहिल्या डावात इंग्लंडवर तब्बल 259 धावांनी आघाडी घेतली होती. त्याचा पाठलाग करताना, पहिल्या सत्रातच इंग्लंडचा निम्मा संघ 103 धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर अश्विनला कुलदीप आणि बुमराहची साथ मिळाली. ठराविक टप्प्यात तिघांनी विकेट्स घेतल्याने, इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांत आटोपला. त्यामुळे भारताने मोठ्या विजयाची नोंद केली. अश्विनने 5, कुलदीप आणि बुमराहने प्रत्येकी 2 आणि तर रवींद्र जाडेजाला 1 विकेट मिळाली. 


इंग्लंडची दाणादाण


दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी भारताने 8 बाद 473 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. भारताचे शेवटचे दोन फलंदाज अवघ्या 4 धावा करुन माघारी परतले. त्यामुळे भारताचा पहिला डाव सर्वबाद 477 धावांवर आटोपला. तोपर्यंत भारताने इंग्लंडवर 259 धावांची आघाडी घेतली होती.


यानंतर इंग्लंडचे फलंदाज दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पण आर अश्विनने इंग्लंडच्या फलंदाजांची पळता भुई थोडी केली. अश्विनने इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं. सलामीवीर क्रॉलीला अश्विनने भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर लगेचच डकेतला माघारी धाडत, अश्विनने इंग्लंडला दुसरा धक्का दिला.  ओली पोपने 19 धावा करुन ज्यो रुटच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अश्विनने त्याचा अडथळा दूर केला. 


यानंतर मग कुलदीप यादवने जॉनी बेअस्ट्रो आणि अश्विनने कर्णधार बेन स्टोकचा काटा काढून इंग्लंडचा निम्मा संघ 103 धावांत माघारी धाडला. यानंतर बुमराह, कुलदीप आणि जाडेजाने अश्विनला साथ देत, इंग्लंडवर मोठा विजय मिळवण्यात मोलाचा वाटा उचलला. 




 


संबंधित बातम्या


टीम इंडियाची विजयाच्या दिशेनं वाटचाल, दुसऱ्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत