India’s squad for tour of Zimbabwe announced: सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे आणि या दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill Captain) याला  झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाचा नवा कर्णधार बनवले गेले आहे.  दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. 


झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार वेगवान गोलंदाज वरुण चक्रवर्तीची निवड करण्यात आलेली नाही. वरुण चक्रवर्तीचा 2021 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करता आली नाही. तेव्हापासून आजपर्यंत वरुण चक्रवर्तीला टीम इंडियात संधी मिळालेली नाही. मात्र नुकताच झालेल्या आयपीएलमध्ये वरुण चक्रवर्तीने चांगली कामगिरी केली होती. यानंतरही झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची निवड न झाल्याने त्याने थेट बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली आहे. 


नेमकं काय घडलं?


झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर वरुण चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर एका स्टोरीद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आणि बीसीसीआयवर नाव न घेता टीका केल्याचं बोललं जात आहे. ''जर माझ्याकडेही पेड पीआर एजन्सी असती....'', असं वरुण चक्रवर्तीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले. तसेच दुसऱ्या स्टोरीमध्ये हे देवा! मी ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची मला शक्ती दे, मी करू शकणाऱ्या गोष्टी बदलण्याचे धैर्य आणि या दोघांमधील फरक समजून घेण्याची बुद्धी दे...असं म्हटलं आहे.


वरुण चक्रवर्तीची आयपीएल 2024 मधील कामगिरी


वरुण चक्रवर्तीने आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी शानदार गोलंदाजी केली. या हंगामात वरुण चक्रवर्तीने 15 सामन्यात 8.04 च्या इकॉनॉमीने 21 विकेट घेतल्या. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होती. जेथे वरुणने चार षटकात 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.


झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा संघ:


शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नितीश रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे.


India vs Zimbabwe चे वेळापत्रक-


पहिली टी-20 - 6 जुलै, हरारे
दुसरी टी-20 - 7 जुलै, हरारे
तिसरी टी-20 - 10 जुलै, हरारे
चौथी टी-20 - 13 जुलै, हरारे
पाचवी टी-20- 14 जुलै, हरारे