Team India WTC Qualification Scenario : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने एकतर्फी विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने 36 वर्षांनंतर भारतात कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले आहे. आता अंतिम फेरी गाठण्याचा मार्गही त्यांच्यासाठी कठीण झाला आहे.






WTC पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाचे मोठे नुकसान 


ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ 74.24 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर होता. मात्र या पराभवानंतर त्याला मोठा धक्का बसला आहे. आता त्याची विजयाची टक्केवारी 68.05 झाली आहे. 2023 ते 2025 या कालावधीत चालणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही तिसरी सायकल आहे. 


या तिसऱ्या सायकलमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत 8 सामने जिंकले आहेत तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर एक सामना अनिर्णित राहिला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया 62.50 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.






वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या फेरीत टीम इंडियाचे आता 7 सामने बाकी आहेत. यातील दोन सामने त्याला न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला पाच कसोटी सामन्यांसाठी दौऱ्यावर जावे लागणार आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर किमान 5 सामने जिंकावे लागतील. याशिवाय 4 सामने जिंकल्यास, भारताला इतर कोणत्या तरी संघाच्या विजयावर किंवा पराभवावर अवलंबून राहावे लागेल. याचाच अर्थ टीम इंडियासाठी आता फायनलपर्यंतचा मार्ग कठीण झाला आहे. बॉर्डर गावसकर करंडक स्पर्धेतील विजयच भारतीय संघाला अंतिम फेरीत नेऊ शकतो.


याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे दोन अंतिम सामने खेळले गेले आहेत. दोन्ही वेळा टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे, मात्र एकदा न्यूझीलंड आणि एकदा ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. यावेळीही भारतीय संघ WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्याचा प्रबळ दावेदार आहे.


हे ही वाचा -


WTC 2025 Points Table : न्यूझीलंडच्या विजयानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ, भारताची टक्केवारी घसरली, रोहित सेना आहे तरी कुठे?