Rohit and Shubhman : भारतीय संघासाठी (Team India) 2023 वर्षाची ची सुरुवात चांगली झाली आहे. भारताने 3 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध (T20) वर्षातील पहिला सामना खेळला, ज्यामध्ये संघाने 2 विकेट राखून विजय मिळवला. यानंतर, टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची घरगुती मालिका खेळली, ज्यामध्ये भारतीय संघाने पाहुण्या संघाचा 3-0 असा पराभव केला. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांमध्ये भारताची सलामीची जोडी कमाल कामगिरी करत असल्याचं दिसून येत आहे. ज्यामुळे भारताला दमदार सलामीवीर मिळाल्याचं दिसून येत आहे. भारताकडून 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) ओपनिंग करताना दिसत आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वीही दोन्ही सलामीवीर चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 2023 मध्ये आतापर्यंत एकूण 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीराची भूमिका निभावली आहे. यापैकी दोघांनी तीन सामन्यांत 50 हून अधिक आणि एका सामन्यात 100 हून अधिकची भागीदारी केली आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पहिल्या विकेटसाठी 143 धावा जोडल्या होत्या. यानंतर दोघांनी दुसऱ्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 33 आणि तिसऱ्या सामन्यात 95 धावांची भागीदारी केली. याशिवाय न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि शुभमन गिल पुन्हा एकदा चांगल्या लयीत दिसले आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात दोघांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी केली. यानंतर दुसऱ्या वनडेत दोघांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली.
मागील पाच सामन्यांमध्ये रोहित-गिलची भागिदारी
143
33
95
60
72
विश्वचषकासाठी सलामी जोडी मिळाली
यंदा एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असून या स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू सलामीला येणं जवळपास निश्चित आहे. दोन्ही खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलनं शानदार द्विशतक झळकावलं. अशा परिस्थितीत त्याचा उत्कृष्ट फॉर्म त्याला विश्वचषकाचं तिकीट नक्कीच मिळवून देईल.
दुसऱ्या वन-डे मध्ये भारत 8 विकेट्सने विजयी
सामन्यात सर्वात आधी भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कॅप्टनचा हा निर्णय गोलंदाजांनी अगदी योग्य असल्याचं दाखवून दिलं. पहिल्या ओव्हरपासून न्यूझीलंडचे गडी तंबूत परतत होते. शमीनं पहिलंच षटक निर्धाव टाकत एक विकेटही घेतली. ज्यानंतर सर्वच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. शमीने भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पांड्या आणि सुंदर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.तर सिराज, कुलदीप आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. विशेष म्हणजे भारताकडून आज गोलंदाजी केलेल्या सहाही गोलंदाजांच्या खात्यात किमान एकतरी विकेट आली. न्यूझीलंडच्या फलंदाजीचा विचार करता सर्वाधिक धावा ग्लेन फिलिप्सने (36) केल्या. तर ब्रेसवेल (22) आणि सँटनर (27) यांनीही थोड्याप्रमाणात डाव सावरला. ज्यामुळे त्यांची धावसंख्या 108 पर्यंत पोहोचली आणि भारताला 109 धावांचं लक्ष्य मिळालं. 109 धावांचं सोपं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवातच दमदार झाली. कर्णधार रोहित शर्माने सलामीवीर शुभमन गिलसोबत (Shubhman Gill) अर्धशतकी भागिदारी केली.त्यानंतर शर्मानं वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केलं. त्याच्या कारकिर्दीतील हे 48 वं आंतरराष्ट्रीय अर्धशतक होतं. ज्यानंतर मात्र लगेचच 51 धावांवर रोहित बाद झाला. कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण शुभमन शेवटपर्यंत मैदानात टिकून होता. त्याने नाबाद 40 तर ईशान किशनने नाबाद 8 धावा करत भारताचा विजय पक्का केला.
हे देखील वाचा-