South Africa vs India 4th T20I : संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शानदार खेळीनंतर अर्शदीप सिंगच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने चौथ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 4 टी-20 सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 18.2 षटकांत 148 धावांत ऑलआऊट झाला. भारताकडून अर्शदीपने तीन, तर वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हार्दिक पांड्या, रमणदीप सिंग आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.






लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली आणि पॉवरप्लेमध्येच चार विकेट्स गमावल्या. यजमान संघासाठी ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलर यांनी संयमी खेळी खेळून संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पुनरागमन करू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी स्टब्सने सर्वाधिक 43 धावा केल्या, तर मिलरने 36 धावा केल्या. मार्को जेन्सनने 12 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 29 धावा केल्या.


तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी त्यांचा हा निर्णय अगदी योग्य असल्याचे दाखवून दिले. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतीय संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 5.5 षटकांत 73 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा 18 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 36 धावा करून बाद झाला.  


तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी जबरदस्त भागीदारी केली. या कारणामुळे टीम इंडियाने अवघ्या 14.1 षटकात 200 धावा पूर्ण केल्या. हे भारताचे आंतरराष्ट्रीय टी-20 मधील सर्वात वेगवान द्विशतक आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनेही अनेक झेल सोडले आणि भारतीय फलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. संजू सॅमसनने अवघ्या 51 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. एका वर्षात तीन टी-20 शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.


यानंतर तिलक वर्मानेही आपले शतक पूर्ण करण्यात वेळ वाया घालवला नाही. त्याने अवघ्या 41 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. तिलक वर्मा यांचे हे सलग दुसरे शतक आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 93 चेंडूत 210 धावांची भागीदारी केली. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारीचा हा विक्रम आहे. संजू सॅमसनने 56 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर तिलक वर्माने 47 चेंडूंत 9 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 120 धावा करून नाबाद राहिला.